भारतीय जनता पार्टीच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या परळीतील वैद्यनाथ साखर कारखान्यावर जीएसटी विभागाने मोठी कारवाई केली आहे, १२ कोटींचा जीएसटी चुकवल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. त्यामुळे कारखान्याची मालमत्ता जप्त होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. केंद्रात आणि राज्यात भाजपाचं सरकार असताना पंकजा मुंडेंवर झालेल्या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

जीएसटी विभागाने कारखान्यात छापा टाकल्यानंतर काही कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. या प्रकरणाची एकंदरीत स्पष्टता अद्याप पंकजा मुंडेंनाही देण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया देताना पंकजा मुंडे म्हणाल्या, “हा कारखाना गेल्या अनेक दिवसांपासून बंद असून त्याला कुलूप लावलं आहे. कारखाना अत्यंत आर्थिक अडचणीत आहे. २०११ पासून कारखान्यातील सातत्याने झालेलं कमी उत्पादन, २०१३-१५ अशा तीन वर्षातील प्रचंड दुष्काळ, उसाचा अभाव आणि अधिकचं कर्ज या कारणांमुळे कारखाना अडचणीत आहे.”

“गोपीनाथ मुंडेंनाही तेव्हा राजकारणामुळे कर्ज मिळालं नाही. त्यामुळे राष्ट्रीय बँकांकडून अधिकच्या व्याजाने कर्ज घ्यावं लागलं. या सगळ्या गोष्टींचा तो परिणाम आहे. ही सगळी तांत्रिक कारणं आहेत. सध्या कारखान्यात कोणीच कामं करत नाहीयेत, त्यामुळे मी स्वत: कुलूप उघडून त्यांना कागदपत्रे दिली आहेत. हा तपास नेमका कसला आहे? हेही मला माहीत नाही. याबाबत मलाही हळुहळू कळेल,” अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी दिली.

Story img Loader