विनायक मेटे, कराड भेटीने चर्चेला उधाण
बीड : दिवंगत गोपीनाथ मुंडेंचे निकटवर्तीय भगवान सेनेचे सरसेनापती फुलचंद कराड यांनी शिवसंग्रामचे आमदार विनायक मेटे यांच्या बरोबर सामाजिक प्रश्नावर काम करण्याची घोषणा केली आहे. दिवंगत मुंडे यांनी दिलेला शब्द त्यांच्या पश्चात पाळला गेला नसून सातत्याने आपल्यावर अन्याय झाल्याची भावना कराड यांनी व्यक्त केल्याने ते पालकमंत्री पंकजा मुंडेंविरोधात बंड करण्याच्या मनस्थितीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. दोन वर्षांंपासून नाराज असलेल्या कराडांची भेट घेऊन आमदार विनायक मेटे यांनी पालकमंत्री पंकजा मुंडे यांना परळी मतदारसंघातच राजकीय शह देण्याचा प्रयत्न केल्याचे मानले जात आहे.
भाजप महायुती घटक पक्षातील शिवसंग्रामचे आमदार विनायक मेटे आणि भाजपच्या मंत्री पंकजा मुंडे यांच्यातील राजकीय शह-काटशह तीव्र झाला आहे. मंत्री मुंडे यांनी शिवसंग्रामच्या जिल्हा परिषद उपाध्यक्षा जयश्री राजेंद्र मस्के यांना आपल्या बाजूने वळवले. तर राष्ट्रवादीचे आमदार जयदत्त क्षीरसागर यांना सोबत घेत आमदार मेटे यांची राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न केला.
घटक पक्षाचे नेते आमदार विनायक मेटेंना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जाहीरपणे मित्र मानत असले, तरी स्थानिक पातळीवर मंत्री पंकजा मुंडे यांच्या विरोधामुळेच मेटेंना मंत्रिपद मिळू शकले नसल्याचा रोष समर्थक व्यक्त करतात. या पाश्र्वभूमीवर आमदार विनायक मेटे यांनी भाजपातील नाराजांना जवळ करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. परळीतील भाजपचे ज्येष्ठ नेते आणि भगवान सेनेचे सरसेनापती फुलचंद कराड यांच्या घरी आमदार मेटे यांनी भेट दिली. कराड यांनीही मेटे यांचे स्वागत करत शिवसंग्राम व भगवान सेना सामाजिक प्रश्नावर एकत्र काम करणार असल्याचे स्पष्ट केले. तर दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी दिलेला शब्द त्यांच्या पश्चात पाळला गेला नसून आपल्यावर सातत्याने अन्याय झाल्याची भावना कराड यांनी व्यक्त करत अप्रत्यक्षपणे मंत्री पंकजा मुंडे यांच्याविरुद्ध बंडाच्या मनस्थितीत असल्याचे स्पष्ट केले. मंत्री पंकजा मुंडे यांच्या परळी मतदारसंघातील भाजपचे चळवळीतील कार्यकत्रे कराड यांना सोबत घेऊन मेटे यांनी राजकीय शह देण्याचा प्रयत्न केला आहे.
भगवान सेनेच्या माध्यमातून राज्यभर ओळख असलेले फुलचंद कराड हे दिवगंत मुंडे यांचे जवळचे मानले जात. मात्र सत्तेच्या पाच वर्षांच्या कालावधीत त्यांना पक्षात मानसन्मान मिळत नसल्याच्या कारणाने कराड हे प्रक्रियेतून काहीसे अलिप्त असल्याचे दिसत होते. काही दिवसांपूर्वी भगवानगडावरून त्यांनी वंजारा समाजाचा एनटीमधून ओबीसीत समावेश करावा यासाठी लढा सुरू केला आहे. या पाश्र्वभूमीवर कराड-मेटे यांची सुरुवातीच्या काळातील सामाजिक प्रश्नावरील युती भाजप नेतृत्वासाठी डोकेदुखी ठरणारी मानली जात आहे. गोपीनाथ मुंडे असते तर कराड हे आमदार झाले असते, आम्ही मुंडेंबरोबर युती केली होती. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रामाणिक असले, तरी भाजपच्या जिल्ह्यातील नेत्यांनी आमची फसवणूक केल्याचे सांगत कराडांच्या राजकीय अपेक्षा फुलवण्याची संधी मेटे यांनी साधली.