मुंबई महापालिकेतील शिवसेना कार्यालयावर ताबा मिळवण्याच्या मुद्द्यावरून बुधवारी (२८ डिसेंबर) ठाकरे आणि शिंदे गटात जोरदार वाद झाला. या वादानंतर पालिकेने सर्वच पक्षांच्या कार्यालयांना टाळे ठोकले आहे. याच मुद्द्यावरून ठाकरे गटातील नेते संजय राऊत यांनी शिंदे गट तसेच राज्य सरकारवर कठोर शब्दांत टीका केली आहे. कोणाच्या आदेशाने हे सुरू आहे. याला कायद्याचे राज्य म्हणत नाहीत. पालिकेतील कार्यालय शिवसेनेचंच राहील, असे संजय राऊत म्हणाले. राऊतांच्या याच विधानाचा आता भाजपाचे नेते तथा आमदार प्रसाद लाड यांनी समाचार घेतला आहे. हिंमत असेल तर पालिकेतील कार्यालय पुन्हा ताब्यात घेऊन दाखवा, असे थेट आव्हान लाड यांनी दिले आहे. ते आज (२८ डिसेंबर) माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> ‘आम्ही बाळासाहेबांच्या प्रत्येक गोष्टीवर अधिकार सांगणार,’ शिंदे गटातील आमदार संजय गायकवाडांचं विधान!

“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी नितांत आदर आहे. बाळासाहेब ठाकरेंसाठी शिवसेनाभवन मंदिर आहे. त्यामुळे या वास्तुबद्दल त्यांच्या काही मनात येईल, हे अगोदर संजय राऊत यांनी डोक्यातून काढून टाकावे. महापालिकेतील शिवसेनेचे कार्यालय ताब्यात घेऊन कोण किती बलवान आहे याचे उत्तर कालच मिळालेले आहे. मी संजय राऊत यांना विचारतो, हिंमत असेल तर मुंबई महापालिकेतील शिवसेनेचे कार्यालय पुन्हा घेऊन दाखवा,” असे आव्हान लाड यांनी राऊतांना दिले.

हेही वाचा >>> “पक्षांतर झालं, इतक्या लवकर रक्तांतर…”, एकनाथ शिंदेंच्या संघ मुख्यालय भेटीवरून राऊतांचा खोचक टोला

“शिवसेना भवनावर अधिकार सांगण्याचा प्रश्नच येत नाही. बाळासाहेब ठाकरे हे आदरस्थान आहेत. आणि ते त्यांचे मंदिर आहे. सरकारचा प्रशासनावर वचक लागतोच. मागच्या सरकारमध्ये मात्र तसे नव्हते. सरकारच प्रशासनाकडून पैसे खात होते, त्यामुळे त्यांचा प्रशासनावर वचक राहिला नव्हता. सरकार कसे चालवायचे याचे प्रशिक्षण संजय राऊत यांनी घेतले पाहिजे,” असा खोचक सल्ला प्रसाद लाड यांनी दिला.

हेही वाचा >>> गुलाम नबी आझाद यांना धक्के, आतापर्यंत १२६ नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी; प्रस्थापित होण्याआधीच अस्तित्व धोक्यात?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच संघ मुख्यालयाला भेट दिली. याच मुद्द्यावरून संजय राऊत यांनी शिंदे यांच्यावर टीका केली. राऊतांच्या या टीकेलाही प्रसाद लाड यांनी उत्तर दिले. “संघ तसेच रेशीम बागेबद्दल संजय राऊत का बोलत आहेत, हे तुम्हाला आता समजले असेलच. त्यांनी हिंदुत्व सोडले आहे. ते सोनिया गांधी आणि शरद पवार यांचे ऐकायला लागले आहेत. हिंदुत्वाची भाषा करणारे आता हिंदुत्व सोडून बोलत आहेत. याच कारणामुळे राऊत रेशीमबागेबद्दल बोलत आहे,” अशी टीका प्रसाद लाड यांनी केली.