येत्या १८ जुलैला देशात राष्ट्रपती पदासाठी निवडणूक होणार आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं नेतृत्व करणाऱ्या भाजपाकडून द्रौपदी मूर्मू यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांकडून यशवंत सिन्हा राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे राजकीय पक्षांकडून मताची जुळवाजुळव सुरू आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राजकीय विरोधक असणाऱ्या भाजपाच्या उमेदवाराला आपला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमधील इतर घटक पक्षांना धक्का बसला आहे. उद्धव ठाकरे यांनी आमच्याशी चर्चा न करता हा निर्णय घेतल्याची टीका काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केली होती.

यानंतर आता भारतीय जनता पार्टीचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी थोरातांच्या विधानाचा चांगलाच समाचार घेतला आहे. काँग्रेसनं केव्हाच आपला स्वाभिमान गहाण टाकलाय, म्हणत त्यांनी काँग्रेसवर बोचरी टीका केली आहे.

हेही वाचा- “धनुष्यबाण शिंदे गटाला द्यावं आणि…” शिवसेनेच्या अंतर्गत वादात रामदास आठवले यांची उडी

माध्यमांशी संवाद साधताना विखे पाटील म्हणाले, “मूळात महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेस पक्षाला नगण्य स्थान होतं. फक्त अर्थप्राप्तीसाठी काँग्रेसचे मंत्री महाविकास आघाडीसोबत गेले होते. त्यांचं किती महत्त्व होतं? हे यापूर्वी जनतेनं पाहिलेलं आहे. मला वाटतं काँग्रेसनं आपला स्वाभिमान केव्हाच गहाण टाकला आहे. मूर्मू यांना पाठिंबा देण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी आम्हाला विचारलं नाही, आज जी टीका होतीये, मला वाटतंय सत्तेत असताना देखील त्यांनी कधी विचारलं नाही. काँग्रेसला राज्यात गृहीत धरण्यात आलं होतं. त्याचं दु:ख आणि शल्य काँग्रेस नेत्याच्या बोलण्यातून मला दिसतंय,” असंही विखे पाटील म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp leader radhakrishna vikhe patil on congress and balasaheb thorat statement presidential election rmm