मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातील मराठा समाज आक्रमक झाला आहे. वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आरक्षणाला विरोध केल्याने गुरुवारी सकाळी काही मराठा आंदोलक तरुणांनी त्यांच्या गाडीच्या काचा फोडल्या आहेत. यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. यावर भाजपाचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मराठा समाजाची मागणी चुकीची आहे, असं अजिबात नाही. गुणरत्न सदावर्ते यांनी प्रक्षोभक बोलणं टाळलं पाहिजे, अशी प्रतिक्रिया विखे पाटील यांनी दिली. ते एका मराठी वृत्तवाहिनीशी संवाद साधत होते.
मराठा आरक्षणाच्या मागणीवर राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, “मराठा समाजाची आरक्षणाची मागणी आजची मागणी नाही. त्या-त्या वेळी तत्कालीन सरकारने मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी मराठ्यांना आरक्षण दिलं, ते उच्च न्यायालयात टिकवलं पण मागील अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकार असताना हे आरक्षण गमावलं. मराठा समाजाची आरक्षणाची मागणी चुकीची आहे, असं अजिबात नाही. आम्हाला प्रत्येकाला मराठा असल्याचा स्वाभिमान आहे आणि समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, ही सगळ्यांचीच मागणी आहे.”
हेही वाचा- “…तर लगेच मराठा आरक्षणाची घोषणा होईल अन् ब्रेकिंग न्यूज येईल”, मनोज जरांगेंचं सूचक विधान
वकील गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीवर झालेल्या हल्ल्यावर भाष्य करताना राधाकृष्ण विखे पाटील पुढे म्हणाले, “मला वाटतं की, गुणरत्न सदावर्तेंसारख्या कार्यकर्त्यांनी प्रक्षोभक बोलणं टाळलं पाहिजे. शेवटी त्या-त्या समाजाच्या भावना असतात आणि ते त्यांच्या पद्धतीने व्यक्त करतायत. त्यांच्या भावनांचा अनादर करण्याचा अधिकार कुणालाही दिला नाही. त्यामुळे त्यांनी तसं बोलणं टाळलं पाहिजे नाहीतर समाज बांधवांच्या भावना तीव्र होतात आणि त्याचे पडसाद उमटतात, हे आपण पाहतोय.”