पुण्यातील पोर्श कार अपघातानंतर राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणीस यांना लक्ष्य करत त्यांच्या एका विधानाचा दाखला देत गृहमंत्र्यांचा राजीनामा का नाही मागायचा? असा प्रश्न केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी विरोधकांवर टीका करताना एखादा श्वान गाडीखाली आला तरी विरोधक गृहमंत्र्यांचा राजीनामा मागतील, असं विधान केलं होतं.
त्यांच्या या विधानाचा दाखला देत अनिल देशमुख यांनी फडणीसांना लक्ष्य केलं. ‘देवेंद्रजी, आता तुम्हीच सांगा आम्ही गृहमंत्र्यांचा राजीनामा का नाही मागायचा?’, असा प्रश्न त्यांनी विचारला. यावर भाजपाचे नेते राम कदम यांनी अनिल देशमुख यांच्यावर टीका करत १०० कोटी वसुली प्रकरणाची आठवण करून देत यासंदर्भात राम कदम यांनी ट्विट केलं आहे.
राम कदम यांनी ट्विटमध्ये काय म्हटलं?
“अहो थोडी तरी लाज वाटू द्या, कारण एकतर देवेंद्र फडणवीस घरी बसून राहिले नाहीत. थेट पुणे आयुक्तालयात गेले आणि कारवाईला गती दिली. तुमच्या माहितीसाठी आता प्रौढ आरोपी म्हणून त्याच्यावर खटला चालणार आहे. तुम्हाला तर राजीनामा मागण्याचा अधिकारच नाही. कारण १०० कोटींची वसुली करायला केवळ एकच मुख्यमंत्री अन् गृहमंत्री या राज्याला लाभला. ते कोण हे आम्ही सांगण्याची गरज नाही. एका धन दांडग्या बिल्डर आरोपीला पिकनिकसाठी पुण्यात जायला कोविड काळात पोलिस ताफा कुणी दिला. हे जरा आठवून पहा, म्हणजे तुम्हाला पुढचे काही बोलण्याची हिंमतच होणार नाही. आता बसली की नाही दातखिळी”, असं राम कदम यांनी म्हटलं आहे.
अनिल देशमुख यांनी काय म्हटलं होतं?
पुण्यातील पोर्श कार अपघातासंदर्भात एक्स या समाज माध्यमावर पोस्ट करत अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं. ते म्हणाले, “देवेंद्रजी काही दिवसांपूर्वी तुम्ही म्हणाला होतात गाडीखाली कुत्रा आला तरी विरोधक राजीनामा मागतील. आज गरिबाघरची दोन लेकरं धनदांडग्याच्या गाडी खाली चिरडली अन् तुमच्या व्यवस्थेने हे दोन जीव घेणाऱ्या हैवानाला पिझ्झा बर्गर खाऊ घातला, दहा तासात जामीन करून दिला (तो पण रविवारी). देवेंद्रजी, आता तुम्हीच सांगा आम्ही गृहमंत्र्यांचा राजीनामा का नाही मागायचा?”, असं अनिल देशमुख यांनी म्हटलं होतं.
पोर्श गाडी अपघात प्रकरणाचे तीव्र पडसाद
पुण्यामध्ये शनिवारी रात्री महागडी पोर्श गाडी बेदरकारपणे चालवून अल्पवयीन चालकाने अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्ट यांना धडक दिली. या धडकेत दोघांचाही मृत्यू झाला. या घटनेचे तीव्र पडसाद पुण्यासह राज्यभर उमटत आहेत. या प्रकरणातील आरोपी मुलगा हा पुण्यातील नामांकित बिल्डरच्या मुलगा आहे. या प्रकरणात आता त्या मुलाच्या बिल्डर वडीलांनाही अटक करण्यात आलेली आहे.