राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलसारख्या संघटनांची विचारसरणीदेखील तालिबानसारखीच असल्याचं वक्तव्य प्रसिद्ध कवी आणि गीतकार जावेद अख्तर यांनी केल्यानंतर वाद निर्माण झाला आहे. यानंतर आता भाजप नेत्यांनी जावेद अख्तर यांनी माफी मागावी आणि वक्तव्य मागे घ्यावं अशी मागणी केली जातेय.
भाजप नेते राम कदम यांनी देखील जावेद अख्तर यांंच्यावर निशाणा साधला आहे. जोपर्यंत जावेद अख्तर माफी मागत नाहीत तोपर्यंत त्याचे आणि त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीचे सिनेमा देशात प्रदर्शित होऊ देणार नाही असा इशारा देखील राम कदम यांनी दिलाय. राम कदम यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात ते म्हणाले, ” जावेद अख्तर यांचं हे वक्तव्य लाजीरवाणं आहे. त्याचसोबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विश्व हिदू परिषदेचे देशभरातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भावना दुखावणारं असून अपमानजनक आहे.”
#संघ तथा #विश्वहिंदूपरिषद के करोडों कार्यकर्ताओ की, जब तक हाथ जोड़कर #जावेदअख्तर माफी नही मांगते. तब तक उनकी तथा उनके परिवार की कोई भी #फिल्म इस #माभारती के भूमि पर नहीं चलेगी. pic.twitter.com/ahWgVQWuvH
— Ram Kadam – राम कदम (@ramkadam) September 4, 2021
“हे वक्तव्य करण्याआधी संघ परिवाशी संबध असलेल्या व्यक्ती या देशाचं नेतृत्व करत आहेत याचा तरी त्यांनी विचार करणं गरजेचं होतं. जर तालिबानसारखी विचारसरणी असती तर आज तुम्ही अशा प्रकराचं वक्तव्य तरी करू शकले असते का?” असं म्हणत राम कदम यांनी जावेद अख्तर यांच्या वक्तव्याचा निषेध केलाय. जावेद अख्तर यांनी राष्ट्रीय सेवक संघ आणि विश्व हिंदू परिषदेच्या सर्व कार्यकर्त्यांची हात जोडून माफी मागावी अन्यथा कुटुंबातील व्यक्तीचा एकही सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही असा इशारा राम कदम यांनी दिलाय.
काय म्हणाले जावेद अख्तर?
जावेद अख्तर असं देखील म्हणाले होते कि, “मला त्यांची वक्तव्य लक्षात नाही मात्र अफगाणिस्तानवर तालिबानने ताबा मिळवल्याचं त्यांनी समर्थन केलंय. पण समर्थन करणारे हे देशातील काही मोजकेच मुसलमान आहेत. मी ज्या अनेक मुस्लीमांशी बोललो त्यांना समर्थन करणाऱ्यांची वक्तव्य ऐकून धक्काच बसला.” यापुढे बोलताना ते म्हणाले कि, ”निश्चितच तालिबानी रानटी आहेत मात्र जे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाला पाठिंबा देत आहेत ते देखील अशाच मानसिकतेचे आहेत.”