शिवसेना उबाठा गटाचे नेते उद्धव ठाकरे हे कुटुंब जनसंवाद दौऱ्यानिमित्त धाराशिव जिल्ह्यात ठिकठिकाणी सभा घेत होते. यावेळी तुळजापूर येथे झालेल्या सभेत त्यांनी पुन्हा एकदा अमित शाह यांच्याकडून अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिला गेला असल्याचा दावा केला. तुळजाभवानी मातेची शपथ घेऊन सांगतो की, अमित शाह यांनी मातोश्रीवर बंद दाराआड अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिला होता. उद्धव ठाकरेंच्या या दाव्यानंतर भाजपाचे नेते आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नाशिक येथे पत्रकारांशी बोलत असताना दानवे यांनी त्यादिवशी मातोश्रीवर काय काय घडले? याचे सविस्तर वर्णनच केले. आतापर्यंत भाजपाचे नेते आणि खुद्द अमित शाह बंद दाराआड चर्चा झाली नसल्याचे सांगत होते. मात्र दानवे यांनी त्यादिवशी प्रसंग सविस्तर सांगितला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाले रावसाहेब दानवे?

पत्रकारांना माहिती देताना दानवे म्हणाले,”ज्यावेळी जागावाटपाची चर्चा झाली, त्यावेळी मी भाजपाचा प्रदेशाध्यक्ष होतो. त्या चर्चेसाठी अमित शाह यांच्यासह मी, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील मातोश्रीवर गेलो होतो. शिवसेनेचेही काही पदाधिकारी चर्चेसाठी त्याठिकाणी आले होते. मातोश्रीवर चर्चा आणि चहापाणी झाल्यानंतर उद्धव ठाकरे सहजपणे अमित शाह यांना म्हणाले की, आपण जरा आत बसू. ते आत गेले आणि २० मिनिटं चर्चा केली. त्यानंतर बाहेर आल्यावर ते एवढेच म्हणाले की, आमचं ठरलं आहे आपण आता पत्रकार परिषद घेऊ. पत्रकार परिषदेत कुणी किती जागा लढवायच्या, तसेच लोकसभा आणि विधानसभेत आमची युती राहणार एवढंच बोलायचं ठरलं होतं.”

महाराष्ट्रातले भाजपाचे उमेदवार ठरले! रावसाहेब दानवेंनी थेट यादीच वाचली

“त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजपाच्या सर्वच नेत्यांनी देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री राहतील, असे विधान केले. पण कोणत्याही शिवसेनेच्या नेत्याने त्यावेळी आक्षेप घेतला नाही. स्वतः उद्धव ठाकरे यांनीही कधी याबाबत वाच्यता केली नाही. पण २०१९ चा निकाल जाहीर झाल्यानंतर माझ्याशिवाय सरकार बनणार नाही, असे जेव्हा चित्र दिसले, तेव्हा दुपारी २ नंतर उद्धव ठाकरेंची भाषा अचानक बदलली. त्याच्या अगोदर ते कधीही त्यापद्धतीने बोलले नव्हते. आमची शिवसेनेबरोबरची युती २५ वर्षांपासूनची होती. मात्र उद्धव ठाकरेंनी असंगाशी संग करून दगाफटका केला”, असा आरोप रावसाहेब दानवे यांनी केला.

आम्ही एक आकडी जागा देण्याबाबत बोललो नाहीत

महायुतीमधील शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला एकेरी आकड्यात जागा दिल्या जातील, अशा चर्चा असल्याची शक्यता रावसाहेब दानवे यांनी फेटाळून लावली. ते म्हणाले की, अशा बातम्या टेबलवर बसून चालविल्या गेल्या आहेत. या बातम्या निराधार आहेत. भाजपाच्या कोणत्या जबाबदार नेत्याने एक आकडी जागा देऊ, असे म्हटलेले नाही. आमची एकत्रित बैठक झाल्यानंतर सन्मानपूर्वक जागावाटप केले जाईल, त्यामुळे कुणालाही नाराज होण्याची गरज नाही.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp leader raosaheb danve clarification on uddhav thackeray claims about half term chief minister post kvg