शिंदे गटातील काही आमदार भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यावर केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनी भाष्य केलं आहे. “एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली या आमदारांनी वेगळं अस्तित्व निर्माण केलं आहे. भाजपामध्ये शिंदे गटाच्या आमदारांना घेण्याचं काहीच कारण नाही. आम्ही आता एकच आहोत. आम्हाला सरकार चालवायचं आहे. सरकारचा ऊर्वरित कार्यकाळ पूर्ण करायचा असून आगामी निवडणुकीतही हेच सरकार निवडून आणायचं आहे”, असे म्हणत शिंदे गटातील आमदारांची भाजपा प्रवेशाची शक्यता दानवे यांनी नाकारली आहे.
आम्ही यांना पाडणार नाही, पण यांच्या अंतर्गत लाथाडीमुळे सरकार पडल्यास आम्हाला दोष देता कामा नये, असेही दानवे यांनी महाविकासआघाडीला उद्देशून म्हटले आहे. शिंदे गटातील आमदार भाजपाच्या वाटेवर असल्याची अफवा महाविकासआघाडीच्या नेत्यांनी पसरवल्याचेही दानवे म्हणाले आहेत. महाविकासआघाडीतील आमदार पक्के राहणार नाहीत. हे आमदारच पळण्याच्या तयारीत असल्याचा पलटवार दानवे यांनी केला आहे.
आम्ही कोणताही राजकीय पक्ष फोडणार नाही आणि कोणाचंही सरकार पाडणार नाही, ही भूमिका २०१९ च्या निवडणुकीपासून भारतीय जनता पक्षाची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. “शिवसेना धोका देऊन काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत गेली असली, तरी त्यांनी जनतेचे प्रश्न सोडवावेत. भाजपाच्या कल्याणकारी योजना सुरू ठेवाव्यात, तसंच त्यांनी नव्या योजनांची भर टाकावी”, असा सल्लाही दानवे यांनी उद्धव ठाकरेंना दिला आहे.