Raosaheb Danve On Shiv Sena Thackeray Group : गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोप सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यातील विविध मुद्यांवरून विरोधक महायुती सरकारवर टीका करत आहेत, तर त्या टीकेला सत्ताधारी पक्षाचे नेते जोरदार प्रत्युत्तर देत आहेत. यातच आज भारतीय जनता पक्षाचा वर्धापन दिन असल्याने राज्यातील विविध ठिकाणी कार्यक्रम पार पडले आहेत. जालना जिल्ह्यात देखील या पार्श्वभूमीवर मजबूत संघटन ऑनलाईन कार्यकर्ता संमेलन पार पडलं.

या संमेलनाच्या माध्यमातून भाजपाचे नेते तथा माजी खासदार रावसाहेब दानवे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. मात्र, याचवेळी रावसाहेब दानवे यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार) आणि ठाकरे गटावर जोरदार टीका केली. यावेळी रावसाहेब दानवे यांनी एक मोठा दावा केला आहे. ‘उद्धव ठाकरे यांची शिवसेना पुढच्या निवडणुकीपर्यंत राहणार नाही’, असं विधान रावसाहेब दानवे यांनी केलं आहे.

रावसाहेब दानवे नेमकं काय म्हणाले?

“एक काळ असा होता की जिल्ह्यात शिवसेनेचे ३ आमदार आणि भारतीय जनता पार्टीकडून मी एकटाच आमदार होतो. मात्र, आज काळ असा आहे की भारतीय जनता पक्षाचे ३ आमदार आणि शिवसेनेचे २ आमदार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचं कोणी आहे का? म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मोठी ताकद होती. पण त्यांच्या वागण्यामुळे आणि व्यवहारामुळे लोक त्यांच्या विचारापासून दूर गेले. त्यामुळे काँग्रेस जवळपास संपुष्टात आली, तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) संपली आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना पुढच्या निवडणुकीपर्यंत राहत नाही”, असं रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे.

नारायण राणे यांचीही उद्धव ठाकरेंवर टीका

भाजपा नेते नारायण राणे यांनीही आज माध्यमांशी संवाद साधत उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. नारायण राणे म्हणाले की, “तुम्ही चांगल्या दिवशी नको त्या माणसाचं नाव घेता. विकास, समृद्धी, लोकहित हे उद्धव ठाकरेंचं काम नाही. शिव्या घालणं आणि चांगल्या कामात व्यत्यय आणणं हे उद्धव ठाकरे यांच काम आहे”, अशा शब्दांत नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.

राणे पुढे म्हणाले की, “त्यामुळे त्यांचा (उद्धव ठाकरे) पक्ष आवळत चालला आहे. पुढच्या निवडणुकीपर्यंत हा पक्ष राहत नाही. मी ३९ वर्ष त्यांच्याबरोबर काम केलं आहे. माननीय बाळासाहेब ठाकरे होते तेव्हा पक्ष होता. पण बाळासाहेब ठाकरे गेले आणि शिवसेना संपली”, अशी टीका नारायण राणे यांनी केली आहे.