औरंगाबाद शहराचं नामकरण ‘संभाजीनगर’ करण्यावरून मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारण तापलं आहे. महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या अखेरच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबाद शहराचं नामकरण ‘संभाजीनगर’ आणि उस्मानाबाद शहराचं नामकरण ‘धाराशीव’ करण्याचा प्रस्ताव मंजूर केला होता. पण त्यांनतर सत्तेत आलेल्या एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारने या प्रस्तावाला स्थगिती दिली आणि काहीच दिवसांत त्यांनी पुन्हा हा प्रस्ताव मंजूर केला.
या प्रस्तावाला एमआयएमने विरोध केला आहे. एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी औरंगाबाद शहरात आंदोलन आणि मोर्चा काढून नामकरण करण्याला विरोध केला. यावरून आता भारतीय जनता पार्टीचे नेते रावसाहेब दानवे यांनी इम्तियाज जलील यांच्यावर बोचरी टीका केली आहे. आधी आपल्या मुलाचं नाव औरंगजेब ठेवा, मग शहराला औरंगाबाद म्हणा, असा खोचक टोला त्यांनी लगावला आहे. ते एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलत होते.
हेही वाचा- आधी पक्षप्रमुख उल्लेख टाळला, आता थेट ‘उद्धव ठाकरे गट’ असा उल्लेख करत एकनाथ शिंदे म्हणाले…
यावेळी बोलताना त्यांनी एमआयएम पक्षाला अनेक सवाल विचारले आहेत. औरंगाबाद शहराच्या नामकरणाबाबत ते म्हणाले की, “एमआयएमला माझा सवाल आहे की, तुम्हाला औरंगजेबबद्दल एवढं प्रेम का आहे? ज्यानं मराठवाड्यावर अन्याय केला, येथील लोकांना त्रास दिला, त्या औरंगजेबबद्दल तुम्हाला इतका पुळका येण्याचं कारण काय? सारा महाराष्ट्र जाणतो, औरंगजेब काय होता? दिल्लीपासून गल्लीपर्यंत सगळेजण जाणतात. औरंगजेब नाव एवढं चांगलं असेल, तर तुम्ही आपल्या मुलाचं नाव औरंगजेब का ठेवत नाहीत?” असा सवालही दानवे यांनी विचारला.
हेही वाचा- “पत्राचाळ घोटाळा प्रकरणात मोहित कंबोज यांचाही समावेश”; सुनील राऊत यांचे गंभीर आरोप
“संपूर्ण संभाजीनगरमध्ये मुस्लीम समाजातील एकाही मुलाचं नाव औरंगजेब नाही, असं मला स्वत:ला माहीत आहे. आधी आपल्या मुलांची नावं औरंगजेब ठेवायला सुरुवात करा, मग आमच्या गावाला औरंगाबाद म्हणा” असा खोचक टोलाही दानवे यांनी यावेळी लगावला आहे.