जत तालुक्यात पाणी प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत असूनही आमदार विक्रमसिंह सावंत हा प्रश्न सोडविण्यास असमर्थ ठरले असल्याचा आरोप भाजपचे विधानसभा प्रमुख तमणगोंडा रवि पाटील यांनी मंगळवारी केला. पाटील यांनी सांगितले, पक्षाच्या आदेशाने आपण तालुययातील ११५ गावांचा दौरा करून विकास कामांचा आढावा घेतला असता ३५ गावातील पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी किरकोळ उणिवा आहेत.
हेही वाचा >>> VIDEO : “राज्यात सरकार तीन पक्षांचं असलं, तरी भाजपा हा…”, देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
यासाठी फार मोठ्या निधीची गरजही भासणार नाही. मात्र, हा निधी लोकप्रतिनिधी या नात्याने आमदार सावंत यांनी उपलब्ध करून दिलेला नाही. यामुळे या गावातील लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. या गावातील जलवाहिनी टाकणे, विंधन विहीर खुदाई यासारख्या निकडीच्या कामाचे प्रस्ताव प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्फत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात आले आहेत, तर काही कामांचे प्रस्ताव खासदार संजयकाका पाटील, आमदार गोपीचंद पडळकर यांच्या निधीतून मंजुरीसाठी पाठविण्यात आले आहेत. जत शहरातील विकास कामासाठी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी पाच कोटींचा निधी मंजूर केला असून या निधीतून कामाचा शुभारंभ लवकरच करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.