कल्याण लोकसभा मतदार संघात भाजपा कार्यकर्ते सांगतील, तोच उमेदवार मान्य केला जाईल. अन्य कोणी उमेदवार सहन केला जाणार नाही, अशी भूमिका भाजपाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. त्यावर “कुणाच्या पोटदुखीतून युतीत विघ्न निर्माण झालं असेल तर माझ्या पदाचा राजीनामा देण्याची तयारी आहे, ” असं मत खासदार श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केलं आहे. यावर सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
श्रीकांत शिंदे नेमकं काय म्हणाले?
“युतीचे काम चांगल्याप्रकारे सुरू असताना केवळ क्षुल्लक कारणावरून एखाद्या वरिष्ठ पोलीस निरिक्षकावर कारवाई होत नाही, तोपर्यंत शिवसेनेला मदत करायची नाही. कल्याण लोकसभेचा उमेदवार आम्हीच ठरवू अशा स्वरुपाचा ठराव केला जातो. आव्हाने देण्यापूर्वी विचार करायला हवा आणि अशी आव्हाने आम्हाला देऊ नका,” असा इशारा श्रीकांत शिंदे यांनी भाजपा पदाधिकाऱ्यांना दिला.
हेही वाचा : मुंबई अध्यक्षपदी वर्षा गायकवाड यांची नियुक्ती, भाई जगताप यांची प्रतिक्रिया; म्हणाले, “माझ्याशी चर्चा…”
“एकनाथ शिंदे यांनी पाऊले उचलली नसती तर…”
“दहा महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाऊले उचलली नसती तर काय परिणाम झाले असते, याचाही विचार भाजपाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी करायला हवा,” असेही श्रीकांत शिंदे यांनी म्हटलं.
“शिवसेना– भाजपा युतीमध्ये मिठाचा खडा…”
“परंतु, काही क्षुल्लक कारणांसाठी शिवसेना– भाजपा युतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचे स्वार्थी राजकारण डोंबिवलीतल्या काही नेत्यांकडून सुरू आहे,” असा आरोपही श्रीकांत शिंदे यांनी केला.
“भाजपा हा कार्यकर्त्यांचा पक्ष”
याबद्दल पंढरपूर येथे रवींद्र चव्हाण यांना प्रसारमाध्यमांनी विचारलं. त्यावर चव्हाण यांनी सांगितलं की, “भाजपाच्या कार्यकर्त्यांनी आणि संघटनेने घेतलेला निर्णय त्यांच्या मनाला पटत असेल. भाजपा हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. त्यामुळे इच्छा आणि कार्यकर्त्यांच्या मनात असलेलं व्यक्त होणं फक्त भाजपात होतं. म्हणून त्यांनी ते व्यक्त केलं आहे. अधिकची माहिती वरिष्ठांना आम्ही देऊ.”
हेही वाचा : “औरंगजेब याच मातीतला”, देवेंद्र फडणवीसांच्या ‘त्या’ वक्तव्यावर प्रकाश आंबेडकरांचं उत्तर, म्हणाले…
“कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना विचारात घेऊन…”
कुणाला पोटदुखी होत असेल तर राजीनामा देतो असं श्रीकांत शिंदे म्हणाले आहेत. त्याबद्दल विचारल्यावर रवींद्र चव्हाण यांनी म्हटलं, “भाजपाच्या कार्यकर्त्यांबाबतच ते बोलले आहेत. भाजपाच्या कार्यकर्त्यांबरोबर तेथील स्थानिक नेते चर्चा करतील. संघटना तेथील कार्यकर्ते, पदाधिकारी यांना विचारात घेऊन देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करेल.”