शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर सहा महिन्यांपूर्वी महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. त्यानंतर एकनाथ शिंदे आणि भाजपाने एकत्र सत्ता स्थापन केली. तेव्हापासून महाराष्ट्रातील राजकारणात काँग्रेसचे आमदार अमित देशमुख आणि आमदार धीरज देशमुख हे भाजपात जाणार असल्याची चर्चा सुरु आहे. यावरती आता माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी भाष्य केलं आहे.
लातूरमध्ये भाजपा युवा मोर्चाच्या मेळाव्याला संभाजी पाटील निलंगेकर संबोधित करत होते. “भाजपात अनेकजण प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त करत आहेत. त्यात लातूरच्या प्रिन्सची सुद्धा इच्छा झाली आहे. पण, लातूरमध्ये ऑक्सिजन नव्हतं तेव्हा प्रिन्स शहराबाहेर होते. आता सत्तेवर राहण्यासाठी आणि आपण केलेली चुकीची काम लपवण्यासाठी भाजपात यायचं म्हणत आहेत. मात्र, हे काय येत नाहीत आणि आम्ही काय घेत नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात आम्हाला प्रिन्स नको, तर सर्वसामान्य कार्यकर्ता भाजपात हवा,” असं संभाजी पाटील निलंगेकर यांनी सांगितलं.
हेही वाचा : “…तर आमच्यात चर्चा होऊ शकते,” एकनाथ शिंदेंसोबतच्या बैठकीनंतर प्रकाश आंबेडकरांचे मोठे विधान!
लातूर महापालिका निवडणुकीबद्दल बोलताना पाटील म्हणाले, “जे कार्यकर्ते ३५ वर्षाच्या आतील आहेत, त्यांनी निवडणुकीची तयारी करावी. महापालिकेच्या ८० टक्के जागांवर ३५ वर्षाच्या आतील कार्यकर्त्यांना संधी दिली जाणार आहे,” असं संभाजी पाटील निलंगेकर यांनी स्पष्ट केलं.
प्रकाश आंबेडकरांनी केलं होतं भाकीत
‘भारत जोडो’ यात्रा महाराष्ट्रात आल्यावर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी अशोक चव्हाण आणि अमित देशमुख यांच्याबद्दल विधान केलं होतं. “काँग्रेसचे आता काहीच शिल्लक राहिलेलं नाही. लातूरकर आणि नांदेडकर कधीही फडवणवीसांच्या मांडीवर जाऊन बसतील,” असं प्रकाश आंबेडकर म्हणाले होते.