एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर पक्षात फूट पडली आहे. पक्षफुटीनंतर शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली आणि शिंदे गटात प्रवेश केला. यानंतर आता ठाकरे गटाने मुंबईत भाजपाला धक्का दिला आहे. उत्तर-मध्य मुंबईतील भाजपाचे सचिव सुधीर खातू यांनी ठाकरे गटात पक्षप्रवेश केला आहे. सुधीर खातू यांनी रविवारी ‘मातोश्री’वर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश केला.
सुधीर खातू यांच्या पक्षप्रवेशानंतर उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी सुधीर खातू यांचं कौतुक केलं. राजकारणात अनेक नेते विरोधी पक्षातून सत्ताधारी पक्षात जात असतात, पण सुधीर खातू हे सत्ताधारी पक्षातून देशप्रेमी आणि हिंदुत्ववादी पक्षात आले आहेत, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी दिली. ते पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात उपस्थितीत कार्यकर्त्यांना संबोधित करत होते.
हेही वाचा – “…तेव्हा अजित पवारांना ५ वर्षांसाठी मुख्यमंत्री बनवू”, देवेंद्र फडणवीसांचं सूचक वक्तव्य
यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, “राजकारणात साधारणत: पक्षप्रवेशाचा जो प्रवाह असतो, तो विरोधीपक्षाकडून सत्ताधारी पक्षाकडे असतो. पण सुधीर खातू यांनी हा प्रवाह उलटा फिरवला आहे. ते सत्ताधारी पक्षातून विरोधी पक्षात आले, असं मी म्हणणार नाही. त्यांनी सत्ताधारी पक्षातून देशप्रेमी आणि हिंदुत्ववादी पक्षाकडे (ठाकरे गट) प्रवाह सुरू केला. महाराष्ट्रातला हिंदू, मराठी आणि जे जे लोकशाही प्रेमी आहेत, ते एकवटलेच पाहिजेत. आताच नाही तर कधीच नाही. आताच आपण हुकूमशाहीची वळवळ गाडली नाही, तर आपल्या भगव्याला काही अर्थ राहणार नाही. आपल्या देशप्रेमाला काही अर्थ राहणार नाही.”
“आज तुमच्या हातात भगवा आहे. त्यावर ‘मशाल’ चिन्ह आहे. पण लक्षात घ्या, भगवा म्हणजेच मशाल आहे. हीच मशाल आणि हाच भगवा देशाला तर दिशा दाखवणारच आहे. शिवाय आपल्यावर होणारे अन्याय आणि अत्याचाराला जाळून टाकणार आहे, याची मला खात्री आहे,” असंही उद्धव ठाकरे म्हणाले.