एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीला युतीची ऑफर दिल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली. शिवसेनेने मात्र या प्रस्तावाला थेट धुडकावून लावून हिंदुत्त्वासोबत तडजोड होणार नाही, अशी भूमिका घेतली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या या भूमिकेवर आज सविस्तर भाष्य केलं आहे. मात्र भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी एमआयएम युती तसेच औरंगाबाद शहराचे नामांतर हे मुद्दे घाऊन शिवसेनेला पुन्हा एकदा लक्ष्य केलंय. एमआयएमला खूश ठेवण्यासाठी औरंगाबाद शहराचे संभाजीनगर असे नामांतर केले जात नाहीये, असा आरोप मुंनगंटीवार यांनी केलाय.
मुनगंटीवार आज जामनेर येथे भाजपा नेते गिरीश महाजन यांच्या कन्येच्या विवाहप्रसंगी आले होते. यावेळी बोलताना “एमआयएमला खुश ठेवण्यासाठी आमच्या शेर राजाचे नाव शहराला द्यायला तयार नाहीत. जेव्हा भाजपा आणि शिवसेनेचं सरकार होतं, तेव्हा २०१५-१६ या साली सारे प्रस्ताव तयार करत आणले आहेत. आता शेवटचा प्रस्ताव मंत्रिमंडळासाठी आहे. पाच वर्षे काय केलं असं आम्हाला विचारलं जातं. पोस्ट ऑफिसपासून प्रत्येक विभागाची एनओसी घ्यावी लागते. या सर्व एनओसी घेऊन टाकल्या आहेत. आमचे सरकार आल्यावर या टर्ममध्ये करायचं ठरवलं होतं. आता कॅबिनेटचा प्रस्ताव विचारार्थ आहे. करा दोन दिवसात. खरेच एमआयएमच्या विरोधात असाल तर संभाजीनगरचा प्रस्ताव करा, या अधिवेशनात मी हा विषय पुन्हा मांडणार आहे,” असे मुनगंटीवार म्हणाले.
तसेच महाराष्ट्राची प्रगती आणि विकास याबाबत बोलताना महाराष्ट्र फक्त गुन्हेगारी आणि माफियाराजमध्ये पुढे आहे, असा टोला मुनगंटीवार यांनी महाविकास आघाडी सरकारला लगावला. “महाराष्ट्र कशात पुढे आहे ? फक्त गुन्हेगारी, माफियाराज, किराना दुकानात वाईन विकने, यामध्ये पुढे आहे. गोरगरिबांच्या घरी किराना देऊन त्यांचे जीवन फाईन करण्याऐवजी, किराना दुकानात वाईन विकून सरकारची तिजोरी फाईन करण्याचं काम होतंय,” अशा तिखट टीका मुनगंटीवार यांनी केली.
स्वातंत्र्यवीर सावरकर जय म्हणायला सांगा
तसेच पुढे बोलताना जम्मू-काश्मीरमध्ये भाजपाने सत्तेला एका सेकंदामध्ये लाथ मारली. काँग्रेसच्या नेत्यांना एकदा स्वातंत्र्यवीर सावरकर जय म्हणायला सांगा. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरती घाणेरडं पुस्तक लिहिलं त्याच्यावर बंदी घालायला सांगा,” असं आव्हान मुनगंटीवार यांनी दिलं. तसेच त्यांनी पुन्हा एकदा नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केली. “नवाब मलिक जर महाराष्ट्राचे मंत्री नसतील तर महाराष्ट्रातील लोक काय उपाशी झोपणार आहेत का ?” असं मुनगंटीवार म्हणाले.