शिवसेना पक्षाचा ५८ वा वर्धापन दिन बुधवारी पार पडला. शिवसेनेतील फूटीनंतर दोन वेगवेगळे वर्धापन दिन साजरे करण्यात आले. यामध्ये ठाकरे गटाचा वर्धापन दिन मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात साजरा करण्यात आला. यावेळी शिवसैनिकांना संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पार्टी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार यांच्यावर हल्लाबोल केला. “पुन्हा येईन पुन्हा येईन असं म्हणणारे आता जाऊ द्या ना घरी वाजवले ना बारा. आता वाजवले की बारा तुमचे”, असा टोला उद्धव ठाकरेंनी फडणवीस यांना लगावला होता.
तसेच ‘सुधीर मुनगंटीवार यांची चंद्रपूरमध्ये जनतेने नखं उपटली आहेत. ते आता लंडनला वाघनखं आणायला चाललेत’, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी मुनगंटीवारांना लगावला होता. त्यांच्या या टिकेला सुधीर मुनगंटीवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडे मूळ वृक्ष नाही तर फक्त वृक्षाची फांदी आहे. ती फांदी घेऊन ते शब्दाच्या काड्या करतात, असं म्हणत त्यांना कोणत्या शिक्षकांनी गणित शिकवलं याचा अभ्यास करावा लागेल”, असा पलटवार सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. ते टिव्ही ९ मराठीशी बोलत होते.
सुधीर मुनगंटीवार काय म्हणाले?
“उद्धव ठाकरे यांच्याकडे टीका करण्याशिवाय काहीही शिल्लक नाही. ठाकरे गटापेक्षा काँग्रेसने लोकसभेला जास्त जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे ठाकरे गटाला धक्का बसला आहे. उद्धव ठाकरे आता टीका करताना स्वाभिमान विसरतात. वाघनखाबाबत ते टीका करतात. अशी टीका केल्यानंतर काही विशिष्ट भागातील मतदान आपल्याला पडेल असा त्यांचा समज आहे”, अशी टीका सुधीर मुनगंटीवार यांनी केली.
“उद्धव ठाकरे हे एका गटाचे नेते आहेत. कारण अधिकृत शिवसेना पक्ष हा एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. कारण निवडणूक आयोग ठरवतं की अधिकृत पक्ष कोणाकडे आहे. त्यानुसार उद्धव ठाकरे यांच्याकडे फक्त वृक्षाची फांदी आहे. ती फांदी घेऊन ते शब्दाच्या काड्या करत राहतात”, अशी खोचक टीका सुधीर मुनगंटीवार यांनी केली.
उद्धव ठाकरेंना कोणत्या शिक्षकांनी गणित शिकवलं?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात विविध मतदारसंघात सभा घेतल्या होत्या. यावरून उद्धव ठाकरे यांनी मोदींवर टीका केली होती. मोदींनी ज्या उमेदवारांसाठी सभा घेतल्या त्या जागा भाजपाला गमवाव्या लागल्या, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. यावर बोलताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले, “उद्धव ठाकरे निवडणुकीच्या प्रचाराला गेले त्या ठिकाणी त्यांनी सर्व जागा जिंकल्या का? राहुल गांधींनी ज्या ठिकाणी प्रचार केला त्या सर्व जागा जिंकल्या का? मग आता असं गणित कोणत्या शिक्षकांनी त्यांना शिकवलं याचा अभ्यास करावा लागेल. हे सर्व आपण भूमिका मांडत असतो. एखाद्या ठिकाणी तु्म्ही जिंकलात. आता ससा कासवाच्या कथेमध्ये एकदा कासव जिंकलं. कासवाने यांच्या सारखं केलं होतं. मात्र, नंतर ते कासव कोणत्याच स्पर्धेत जिंकलं नाही”, असा टोला सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव टाकरे यांना लगावला.