Sudhir Mungantiwar : भारतीय जनता पक्षाचे नेते तथा माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार हे गेल्या काही दिवसांपासून नाराज असलेच्या चर्चा राजकीय वर्तुळात आहेत. विधानसभेच्या निवडणुकीनंतर राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार सत्तेत आलं. मात्र, या महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात आमदार सुधीर मुनगंटीवार यांना स्थान देण्यात आलं नाही. मंत्रिमंडळातून डावलण्यात आल्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या मनातील खदखद अनेकदा व्यक्तही केली आहे. मंत्रिपद न मिळाल्याने नाराज असल्याच्या चर्चांवर त्यांना अनेकदा माध्यमांच्या प्रतिनिधींनी प्रश्न विचारले. पण त्यांनी नाराजीच्या चर्चा फेटाळून लावल्या.

सुधीर मुनगंटीवार यांनी नाराजीच्या चर्चा अनेकदा फेटाळून लावल्या असल्या तरी सूचक विधानं करून त्यांनी आपल्या मनातील सल बोलून देखील दाखवलेली आहे. आता पुन्हा एकदा सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या मनातील मंत्रिपदाबाबतची खदखद व्यक्त केली आहे. चंद्रपूरमधील एका कार्यक्रमात बोलताना सुधीर मुनगंटीवार यांनी सूचक विधान केलं आहे. त्यांच्या या विधानानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात आणि विशेषतः भारतीय जनता पक्षाच्या गोटात चर्चांना उधाण आलं आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील एका कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाचे नेते आशिष शेलार यांच्यासह आदी नेते उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर आपलं मनोगत व्यक्त करताना आणि आशिष शेलार यांच्या समोरच सुधीर मुनगंटीवार यांनी आपली खदखद व्यक्त केली. ‘दिल्लीचे तख्त राखताना जर चंद्रपूरला वजा केलं तर महाराष्ट्राच्या विकासाचं उत्तर शून्य येईल’, असं सूचक विधान सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे. त्यांच्या या विधानाचा अर्थ काय? याबाबत आता राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहेत.

सुधीर मुनगंटीवार काय म्हणाले?

“राज्यगीतामधील एक शब्द मी आज निवडला आहे. दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा. मात्र, दिल्लीचे तख्त महाराष्ट्राला राखायचं असेल आणि दिल्लीचे तख्त राखताना जर चंद्रपूरला वजा केलं तर महाराष्ट्राच्या विकासाचं उत्तर शून्य येईल. तसेच जर चंद्रपूरचा १ जोडला तरच १० नंबरी विकास होईल. यासाठी आपण आपली शक्ती चंद्रपूरच्या विकासाच्या पारड्यात टाकावी”, असं सूचक विधान सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे.