शिवसेना खासदार संजय राऊत यांना अखेर जामीन मिळाला असून ते ऑर्थर रोड कारागृहातून बाहेर आले आहेत. पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीने त्यांना अटक केली होती. संजय राऊतांना जामीन मिळाल्यानंतर भारतीय जनता पार्टीचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊतांना जामीन मिळाला आहे, पण त्यांची निर्दोष मुक्तता झाली नाही, अशी प्रतिक्रिया मुनगंटीवारांनी दिली आहे. ते ‘एबीपी माझा’ वृत्तवाहिनीशी बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संजय राऊतांच्या जामिनावर प्रतिक्रिया देताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले, “भारतीय जनता पार्टी किंवा एखादा राजकीय पक्ष म्हणून या घटनेकडे एका विशिष्ट नजरेतून बघण्याची आवश्यकता नाही. ही एक कायदेशीर प्रक्रिया आहे. एखादा राजकीय नेता असो वा एखादा सामान्य गुन्हेगार असो, जेव्हा त्याच्याविरोधात आरोपपत्र दाखल केलं जातं, त्यानंतर विशिष्ट कालावधीने त्याला जामीन मंजूर केला जातो.

हेही वाचा- संजय राऊतांना जामीन मंजूर; दीपक केसरकरांनी दिल्या सदिच्छा, म्हणाले…

“या प्रकरणात संजय राऊत निर्दोष आहेत किंवा न्यायालयाच्या आदेशानुसार एफआयआर पूर्णपणे रद्द केलाय, अशी कोणतीही माहिती अद्याप मला मिळाली नाही. असं अनेक प्रकरणांत घडलं आहे. अर्णव गोस्वामी यांनाही जामीन मिळाला होता, पण खटला अजून संपला नाही. नवनीत राणा यांनी खासदार म्हणून काही मुद्दे उपस्थित केले होते. त्यांनाही अटक झाली होती, त्यानंतर त्यांनाही जामीन मिळाला. केतकी चितळे यांनीही सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली होती. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला. त्यानंतर त्यांचीही जामिनावर सुटका झाली. पण त्यांचा खटला अद्याप सुरू आहे. यामुळे जामीन मिळण्याचा खटल्याच्या निर्णयाशी काहीही संबंध नाही” अशी प्रतिक्रिया मुनगंटीवार यांनी दिली आहे.

हेही वाचा- तुरुंगाबाहेर येताच संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

मुनगंटीवार पुढे म्हणाले की, गज्या मारणे नावाचा एक गुंड होता. त्यालाही जामीन मिळाला होता. तो तुरुंगातून बाहेर आल्यानंतर मोठी रॅली निघाली. त्यानंतर त्याला पुन्हा अटक झाली, ही एक कायदेशीर प्रक्रिया आहे. त्यामुळे संजय राऊतांना जामीन मिळण्यावर भाष्य करण्यासारखं काहीही नाही. त्यांची जेव्हा निर्दोष मुक्तता होईल, तेव्हा यावर प्रतिक्रिया देता येईल. आताच यावर प्रतिक्रिया देणं जरा घाईचं ठरेल, असंही मुनगंटीवार म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp leader sudhir mungantiwar on sanjay raut granted bail released from jail rmm