विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना बदली घोटाळा अहवाल लीक प्रकरणी पोलिसांनी नोटीस बजावली आहे. यासंदर्भात आज दुपारी १२ वाजल्यापासून देवेंद्र फडणवीसांच्या बंगल्यावर पोलीस पथक दाखल झालं असून त्यांची चौकशी सुरू केली आहे. यासंदर्भात राज्यभर भाजपाकडून तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत असून भाजपाच्या अनेक नेतेमंडळींनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी यासंदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना राज्य सरकारला दुर्योधन-दु:शासनाचेही बाप ठरवत निशाणा साधला आहे.
“…म्हणून यांचा बीपी वाढला”
भाजपानं नुकत्याच झालेल्या पाच राज्यांमधल्या विधानसभा निवडणुकांमध्ये चार राज्यांत दमदार यश मिळवल्यामुळेच हा प्रकार सुरू असल्याचा आरोप सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. “विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत जे पुरावे उपलब्ध करून दिले, त्याचं कौतुक करण्याऐवजी चार राज्यांत भाजपाचा विजय झाला, म्हणून यांचा बीपी वाढला. त्यामुळे सूडाच्या भावनेने सत्तेचा दुरुपयोग करत, सत्तेची मस्ती आणि अहंकार दाखवत देवेंद्र फडणवीसांना सीआरपीसी १६०ची नोटीस देण्यात आली”, असं मुनगंटीवार म्हणाले.
“हा तर सरळ सरळ हक्कभंग”
“२७ वर्ष मी विधानसभेचा सदस्य आहे. अनेकदा अशा प्रसंगी विधानसभा अध्यक्ष निर्देश देतात की जेव्हा एखादा सदस्य कुठली माहिती विधानसभेत उघड करतो, तेव्हा त्याला विधानसभेच्या नियमांचं संरक्षण आहे. विधानसभेच्या सभागृहात जी माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली, त्या माहितीच्या आधारे जर पोलीस त्यांना समन्स बजावत असतील, जबाबासाठी-चौकशीसाठी बोलवत असेल, तर हा त्यांचा हक्कभंग आहे”, असं मुनगंटीवार म्हणाले.
“जर महाविकासआघाडी आणि पवार यांचं दाऊद इब्राहिमवर इतकच प्रेम असेल तर…” ; नितेश राणेंचं विधान!
“अंधेर नगरी, चौपट राजा”
“ही जगातली एकमेव केस असेल, जिथे भ्रष्टाचार उघडकीस आणणाऱ्यांना नोटीस पाठवली आहे. हा अजब सरकारकी गजब कहानी अंधेर नगरी चौपट राजा टकासीर भाजी टकासेर खाजा.. आता दुर्योधन-दु:शासनही म्हणत असतील की रिश्ते में तो ये सरकार हमारी बाप लगती है. कारण हे तर आमच्यापेक्षा दुष्टपणे वागत आहेत”, अशा शब्दांत मुनगंटीवार यांनी राज्य सरकारला खोचक टोला लगावला आहे.