लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी लागणार आहे. लोकसभा निवडणूक संपल्यानंतर काही महिन्यांत महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजण्याची शक्यता आहे. त्यामुळे राजकीय पक्ष आतापासून तयारीला लागल्याचं चित्र आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची सोमवारी मुंबईत महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत छगन भुजबळ यांनी महायुतीत अजित पवार गटाला विधानसभेला किती जागांचा शब्द देण्यात आला होता? यावर भाष्य केलं. विधानसभेच्या निवडणुकीत ८० ते ९० जागा देण्याचा शब्द दिलेला असल्याचं विधान छगन भुजबळ यांनी केलं. त्यांच्या या विधानानंतर महायुतीतील नेत्यांच्या प्रतिक्रिया येण्यास सुरूवात झाली आहे. आता भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी छगन भुजबळांच्या विधानाला उत्तर देत अशा प्रकारचं धुकं निर्माण करू नका, असं म्हटलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सुधीर मुनगंटीवार काय म्हणाले?

“जागावाटप असेल किंवा विधानसभेच्या जागावाटपासंदर्भातील मागणी असेल ही मागणी चॅनेलच्या माध्यमातून कधीही होत नाही. मात्र, यातून काही कारण नसताना अडचणी आणि समस्या निर्माण होतात. विधानसभेच्या जागावाटपासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं काही मत असेल किंवा इतरांचं मत असेल त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, जे पी नड्डा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली पाहिजे. चॅनलच्या माध्यमातून आम्हाला इतक्या जागा हव्यात, असं म्हणणं गैर आहे. यामध्ये तुम्हाला कोणी आश्वस्थ केलं, याचा कोणताही पुरावा नसतो, तरीही सांगायचं असेल तर स्पष्टपणे सांगितलं पाहिजे. आम्हाला एवढ्या जागा देण्यासंदर्भात या नेत्यांने शब्द दिला होता. पण अशा प्रकारचं धुकं निर्माण करण्यात काहीही कारण नाही”, असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा : “मोदी यांची प्रकृती बरी नाही, पण लक्षात कोण घेतो?” ठाकरे गटाचा मोदींना टोला

छगन भुजबळ काय म्हणाले होते?

“एक निवडणूक झाली. आता यापुढे महायुतीत आपल्याला योग्य तो वाटा मिळाला पाहिजे. आपण आलो तेव्हा त्यांनी आपल्याला ८० ते ९० जागा मिळतील असं सांगितलं होतं. यावेळेला (लोकसभेला) जी खटपट झाली ती खटपट पाहाता पुढे अशी खटपट होता कामा नये. आम्हाला एवढ्या जागा मिळाल्या पाहिजे. हे त्यांना सांगावं लागेल. तेवढ्या मिळाल्या तर ५०, ६० निवडून येतील. अन्यथा तुमच्या ५० आहेत, मग ५० घ्या. मग त्यातून पुन्हा किती निवडून येणार?”, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं होतं.

देवेंद्र फडणवीसांनी काय प्रतिक्रिया दिली होती?

विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाला ८० ते ९० जागा देण्याचा शब्द दिला होता. तेवढ्या जागा मिळायला हव्यात, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं होतं. यावर देवेंद्र फडणवीस यांनीदेखील प्रतिक्रिया दिली होती. ते म्हणाले होते, “विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तीनही पक्षाचे नेते एकत्रित बसतील. योग्य फॉर्म्युला ठरवतील. त्यानुसार तिनही पक्षाला जागा मिळतील. भाजपा सर्वात मोठा पक्ष असल्याने भाजपाला सर्वाज जास्त जागा मिळतील. मात्र, आमच्याबरोबरच्या दोनही पक्षाचा सन्मान केला जाईल”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp leader sudhir mungatiwar on ncp chhagan bhujbal statement to assembly elections mahayuti politics gkt