दिल्ली शरद पवारांच्या नावाने घाबरते. शरद पवार यांनी आपला शेवटचा डाव राखून ठेवला आहे. तो डाव सर्वांनाच चितपट करेल, असे जयंत पाटील म्हणाले. ते २१ फेब्रुवारी रोजी पुण्यात एका सभेला संबोधित करत होते. जयंत पाटलांच्या याच विधानावर भाजपाचे नेते सुजय विखे यांनी टीका केली. जयंत पाटील हेच राष्ट्रवादीत किती दिवस थांबणार हे त्यांना विचारले पाहिजे, असा टोला सुजय विखेंनी लगावला. ते अहमदनगरमध्ये माध्यम प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देत होते.
सुजय विखे काय म्हणाले?
“जयंत पाटील हेच राष्ट्रवादीत आणखी किती दिवस राहणार हे एकदा विचारलं पाहिजे. शरद पवारांचा शेवटचा डाव जयंत पाटील हेच टाकतील, असं वाटतंय,” असा टोला सुजय विखे यांनी लगावला.
जयंत पाटील काय म्हणाले होते.
जयंत पाटील २१ फेब्रवारी रोजी पुण्यात एका सभेला संबोधित करत होते. यावेळी त्यांनी भाजपा, अजित पवार गटावर टीका केली. “शरद पवार यांनी साताऱ्यात सभा घेतली. ती सभा सर्वांनीच पाहिली. गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे २० ते २२ आमदार निवडून येतील असे सांगितले जात होते. बघता बघता राष्ट्रवादीचे ५४ आमदार निवडून आले. ही ताकद शरद पवार यांच्यात आहे. शरद पवार काय करतील याचा लोक दहावेळा विचार करतात,” असे जयंत पाटील यांनी सांगितले.
“चितपट करणारा डाव अजून बाहेर यायचा बाकी”
“आम्ही शरद पवारांच्या नेतृत्वाखाली अनेक वर्षे काम केलं. आम्ही त्यांचे अनेक डाव पाहिलेत. आम्ही शरद पवारांचे अनेक डाव शिकलो आहोत. एक लक्षात घ्या वस्तादाने त्याचा एक डाव शिल्लक ठेवलेला असतो. तो डाव जेव्हा समोर येतो, तेव्हा सगळेच आश्चर्यचकित होतात. तुम्ही-आम्ही सर्वांनीच शरद पवार यांचा अनुभव घेतलेला आहे. पण सर्वांना चितपट करणारा शरद पवारांचा डाव अजून बाहेर यायचा आहे. तुम्ही काळजी करू नका. तो दिवस जेव्हा येईल, तेव्हा सगळेच आश्चर्यचकित होतील,” असे जयंत पाटील म्हणाले.