Sujay Vikhe Patil On Vidhan Sabha Election : राज्यात विधानसभेच्या निवडणुकीची (Vidhan Sabha Election 2024) रणधुमाळी सध्या सुरु आहे. विविध मतदारसंघात दिग्गज नेत्यांच्या सभांचा धडाका सुरु आहे. यामध्ये अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्हा आणि संगमनेर विधानसभा मतदारसंघ मागील काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात चांगलाच चर्चेत आहे. याच कारण म्हणजे थोरात आणि विखे पाटील या दोन्ही नेत्यांमध्ये सुरु असलेले राजकीय आरोप-प्रत्यारोप. बाळासाहेब थोरात हे संगमनेर मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवत आहेत तर राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) हे शिर्डी मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात आहेत. सध्या प्रचार सुरु असल्यामुळे थोरात आणि विखे अशा दोन्हीही नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागल्याचं पाहायला मिळत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

माजी खासदार सुजय विखे हे संगमनेर मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढणार अशी चर्चा सुरु होती. त्याबाबत त्यांनी इच्छाही बोलून दाखवली होती. तसेच संगमनेरमध्ये त्यांनी अनेक सभाही घेतल्या होत्या. पण सुजय विखे यांच्या संगमनेरमधील एका सभेत वसंत देशमुख यांनी बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्या कन्या जयश्री थोरात यांच्याबाबत बोलताना आक्षेपार्ह वक्तव्य केलं आणि या वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटले. यावरून विरोधी पक्षाकडून सुजय विखे यांच्यावरही टीका झाली. मात्र, यानंतर संगमनेरमधून सुजय विखेंची (Sujay Vikhe) विधानसभेची संधी हुकल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

हेही वाचा : उद्धव ठाकरेंचं जय शाह यांना खुलं आव्हान; म्हणाले, “गावातील कोणत्याही तरुणाबरोबर क्रिकेट खेळून दाखवावं, मग…”

यावरच आता खुद्द सुजय विखे यांनी एका सभेत बोलताना भाष्य केलं आहे. “माझ्या नशीबात सध्या गडबड सुरु असून माझं काही शिजायला लागलं की लगेच कुणीतरी पातेल्याला लाथ मारतं. लोकसभेपासून माझे ग्रहमान काही ठीक नाहीत, असं सुजय विखे यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या विधानाची पुन्हा एकदा नगरच्या राजकारणात चर्चा रंगली आहे.

सुजय विखे काय म्हणाले?

“माझ्या नशीबात सध्या गडबड सुरु आहे. माझं काही शिजायला लागलं की लगेच कुणीतरी पातेल्याला लाथ मारतंय. लोकसभेच्या निवडणुकीत मार्चपर्यंत एकदम व्यवस्थित होतं. एप्रिलमध्ये काय गडबड झाली माहिती नाही. मग म्हटलं चला खासदारकी गेली मग आमदार होऊ. मग संगमनेरला गेलो. संगमनेरमध्ये चार सभा घेतल्या आणि लोक म्हणाले की आता सुजय विखे हेच आमदार होणार. तेवढ्यात वसंतराव (वसंत देशमुख) उठले आणि आमच्या शिजलेल्या पातेल्याला लाथ मारून टाकली. त्यामुळे माझं काय ग्रहमान लोकांसाठी ठीक दिसत नाही. मला बोलवू नका. तुमचं चाललंय चालूद्या. मी योग्य त्या गोष्टी वेळेवर करेन”, असं सुजय विखे एका सभेत बोलताना म्हणाले आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp leader sujay vikhe patil on sangamner politics maharashtra assembly election 2024 gkt