केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांची भाजपच्या काही वरिष्ठ नेत्यांकडून, तसेच मंत्र्यांकडून अडवणूक केली जात असल्याचा दावा भाजपचे ज्येष्ठ नेते सुब्रमणियन स्वामी यांनी करत तीव्र नाराजी व्यक्त केली. गडकरींची विकासाची दृष्टी स्पष्ट असून अतिशय वेगाने त्यांनी कामाला सुरुवात केल्याचे स्वामी यांनी सांगितले. अशा वेळी त्यांची अडवणूक करणे योग्य नाही. भाजपतील आपल्याच एका वरिष्ठ मित्र नेत्याकडून असे होत असल्याचे सांगतानाच मित्राचे नाव सांगण्यास मात्र त्यांनी स्पष्ट नकार दिला. गडकरी आता पक्षाचे अध्यक्ष नाहीत, याबद्दलही त्यांनी खेद व्यक्त केला.
हंसराज अहिर यांचे त्यांनी कौतुक केले. १७६ कोटींचा कोळसा घोटाळा उघडकीस आणणारे केंद्रीय मंत्री हंसराज अहिर कामाच्या बाबतीत वाघ आहेत असे प्रशस्तिपत्रक त्यांनी दिले. ताडोबा व्याघ्र प्रकल्प चंद्रपुरात असला तरी येथील खरा वाघ अहिर यांच्या रूपाने दिल्लीत काम करत असल्याचे सांगितले.
‘याकूबला फाशीच हवी’
अभिनेता सलमान खान याने याकूब मेमनच्या फाशीचा विरोध करणे म्हणजे, एका आरोपीने दुसऱ्या आरोपीचा बचाव करण्याचा हा प्रकार आहे. सलमान स्वत: आरोपी आणि सध्या जामिनावर असताना त्याने असे वक्तव्य करणे हा न्यायव्यवस्थेचा अपमान आहे. मुंबईत बॉम्बस्फोटात शेकडो निष्पापांचे बळी घेणाऱ्या याकूबला फाशी झालीच पाहिजे, असे मत स्वामी यांनी व्यक्त केले.
लोकमान्य टिळक स्मारक समितीच्या वतीने आयोजित कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांनी येथे पत्रकारांशी संवाद साधताना याकूब मेमनच्या फाशीला हिंदू विरुद्ध मुस्लीम, असा रंग देण्याचा प्रकार केला जात असल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.
स्वातंत्र्यानंतर आजवर १७० आरोपींना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली असून यात केवळ १७ मुस्लीम समाजाचे आहेत. त्यामुळे केवळ मुस्लिमांनाच फाशी दिली जात आहे, या म्हणण्याला काही अर्थ नाही. असा प्रचार जाणीवपूर्वक केला जात आहे.
पाकिस्तान अनेक दहशतवादी तयार करत आहेत. इसीसचे दहशतवादी पाकिस्तान मार्गे जम्मू-काश्मीर व श्रीलंका मार्गे तामिळनाडून दाखल झाले असल्याने पाकिस्तानला धडा शिकविण्याची गरज त्यांनी बोलून दाखविली. जम्मू-काश्मिरातून ३७० कलम योग्य वेळ येताच रद्द करण्यात येईल, असेही ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वर्षभराचा कार्यकाळ चांगला असून येत्या वर्षभरात अधिक वेगाने बदल घडून येतील.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp leaders are hurdles for gadkari