महिला कुस्तीपटूंच्या राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करणाऱ्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या व्यासपीठावर भाजप नेत्यांचाच वरचष्मा पाहून काँॅग्रेस नेत्यांचा तीळपापड उडाला असून आज झालेल्या प्रदेश काँॅग्रेस समितीच्या बैठकीत याचे पडसाद उमटले.
जिल्हा युवक काँॅग्रेसचे कार्याध्यक्ष तसेच वर्धा लोकसभा मतदारसंघ संघाचे युवक काँॅग्रेसचे अध्यक्ष डॉ. पंकज भोयर यांना या स्पर्धेच्या आयोजनानिमित्त काँॅग्रेस नेत्यांनी आरोपी केले आहे. राज्य कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्ष असलेले भाजप नेते व माजी आमदार रामदास तडस यांनी डॉ. भोयर यांच्याशी स्पर्धेच्या निमित्ताने केलेली मैत्री नव्या राजकीय वादगांचे निमित्त ठरली आहे.
राज्य स्पर्धेची जबाबदारी तडस यांनी भोयर यांच्यावर टाकली. जबाबदारी पार पाडण्याचे कौशल्य दाखविणाऱ्या भोयर यांना मात्र या निमित्ताने जिल्ह्य़ात काँग्रेस वर्तुळाने चोहोबाजूने घेरण्याचे ठरविले आहे. तडसांचा हेतू सफल झाला, पण भोयर सापळयात सापडले. पक्षांतर्गत वादळ उठण्यामागे तडसांनी साधलेली संधी हेच एक कारण आहे. डॉ. भोयर हे राज्यमंत्री रणजित कांबळेंच्या गोटातून उदयास आले, पण वर्षभरापूर्वी त्यांनी कांबळेंशी वैर पत्करले. शिवाय अन्य जिल्हा काँग्रेस नेत्याचे बोट न पकडता त्यांनी थेट नारायण राणे गटाची पालखी उचलणे पसंद केले. तडस व कांबळे यांचे शत्रुत्व सर्वपरिचित आहे. महिला विकास संस्थेच्या आवारात तडसांच्या कुस्ती संघटनेला निमंत्रित करतानाच भोयर यांनी संस्थेची सर्व ती मदत दिली. याचा पूरेपूर उपयोग करून घेतील तर ते तडस कसले? असे पाहुण्यांच्या गर्दीकडे पाहून म्हटले जाते. तडस यांच्याखेरीज माजी आमदार अरुण अडसड, भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. शिरीष गोडे, कांबळे यांना जेरीस आणणारे जि.प. सदस्य मिलिंद भेंडे व राणा रणनवरे यांची पुरस्कार वितरणप्रसंगी उपस्थिती होती. रणजित कांबळे व शेखर शेंडे या काँग्रेस नेत्यांच्या विरोधकांची अशी उपस्थिती काँग्रेस वर्तुळास खटकली. खासदार दत्ता मेघे प्रमुख पाहुणे होते. पदोपदी मेघेंप्रति आदर व्यक्त करणारे तडस यांनी मेघेंना बोलावणे अपेक्षितच होते. खासदार म्हणून ते आले. असा खुलासा आल्यावर मग नगराचे प्रथम नागरिक म्हणून आकाश शेंडेंना का निमंत्रण नव्हते? जिल्हा कुस्ती संघटनेचे अध्यक्ष आमदार प्रा. सुरेश देशमुख यांची हजेरी का नव्हती? असे प्रश्न आता भोयरविरोधक उपस्थित करीत आहेत. काँग्रेसचे जबाबदारीचे पद भूषविणाऱ्या भोयर यांचे भाजप प्रेम आश्चर्यात टाकणारे आहे, असे मत काँग्रेस नेते शेखर शेंडे यांनी व्यक्त केले.
काँग्रेस नेत्यांना खिजवण्यासाठीच भोयर यांनी भाजप नेत्यांना बोलावल्याचा आरोप होतो. उद्घाटनास आमदार देवेंद्र फ डणवीस, सुरेश वाघमारे, विजय मुडे, महापौर अनिल सोले हे भाजप नेते आले. भाजप नेत्यांच्या अशा हजेरीस तडस कारण असले तरी काँग्रेसचे भोयर यांनी या नेत्यांच्या स्वागतास पायघडय़ा पसरण्याचे व स्वत:ला मिरविण्याचे कारण काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
या पाश्र्वभूमीवर मुंबईत झालेल्या प्रदेश काँग्रेसच्या बैठकीत भोयर यांच्या पक्षनिष्ठेचा मुद्या उपस्थित करण्यात आल्याचे एका काँग्रेस नेत्यांने स्पष्ट केले. एका दलित पदाधिकाऱ्यास डावलून डॉ. भोयर यांनी स्वत: हुशारीने युवक काँग्रेसचे पद लाटल्याची बाबही युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम यांच्याकडे मांडणार असल्याचे या नेत्याने ‘लोकसत्ता’शी बोलताना स्पष्ट केले. या गदारोळावर बोलताना डॉ. पंकज भोयर म्हणाले, हा अराजकीय कार्यक्रम होता. त्यामुळे सर्वच पक्षाच्या नेत्यांना निमंत्रण पत्रिकेवर स्थान मिळाले. या स्पर्धाचा जिल्ह्य़ास लाभ व्हावा, हाच हेतू होता.
राष्ट्रवादी काँग्रेसचे असलेले आमदार सुरेश देशमुख यांना भोयर गट वैरी मानतो. कांबळे-देशमुख यांचे असलेले सख्य या गटाला रुचलेले नाही. त्यातूनच तडसांना व भाजप नेत्यांना हारतुरे घालणाऱ्या भोयर यांचा पवित्रा राहिला, पण जिल्ह्य़ात एकही काँग्रेस नेत्याचे नेतृत्व न मानणाऱ्या भोयर यांना भाजप जवळचा कसा? असा प्रश्रं करीत काँग्रेस नेते विरोधात सरसावले आहेत.
काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या व्यासपीठावर भाजप नेत्यांचाच वरचष्मा
महिला कुस्तीपटूंच्या राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करणाऱ्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या व्यासपीठावर भाजप नेत्यांचाच वरचष्मा पाहून काँॅग्रेस नेत्यांचा तीळपापड उडाला असून आज झालेल्या प्रदेश काँॅग्रेस समितीच्या बैठकीत याचे पडसाद उमटले. जिल्हा युवक काँॅग्रेसचे कार्याध्यक्ष तसेच वर्धा
First published on: 10-01-2013 at 04:38 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp leaders in front on congress stage