शिर्डी : भाजपच्या नेत्यांनी प्रसिद्धीमाध्यमांपुढे ऊठसूठ वक्तव्ये किंवा बोलघेवडेपणा करू नये, अशा कानपिचक्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी विस्तारित प्रदेश सुकाणू समितीच्या बैठकीत दिल्या. त्याचबरोबर सरकारची प्रतिमा जपण्याची जबाबदारी संघटनेतील नेत्यांनीही पार पाडली पाहिजे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
हेही वाचा >>> सत्तेमुळे सुखासीन झाल्यास जनतेशी द्रोह ठरेल! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे परखड मतप्रदर्शन
भाजपचे प्रदेश अधिवेशनाचा समारोप झाल्यावर शहा यांनी विस्तारित सुकाणू समिती व निवडक ३० नेत्यांची बैठक घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण, पंकजा मुंडे आदी नेते त्यास उपस्थित होते.पक्षातील काही नेते, आमदार, मंत्री कोणत्याही विषयांवर प्रसिद्धीमाध्यमांपुढे भाष्य करतात. त्यामुळे सरकार व पक्षाची अनेकदा पंचाईत होते. त्यामुळे पक्षाकडून सूचना आल्यावरच नेत्यांनी संबंधित विषयावर बोलावे, अन्यथा बोलू नये, अशी सूचना शहा यांनी केली. त्याचबरोबर जातीयवादी मुद्दे किंवा विषयांपासून नेत्यांनी दूर राहावे. समाजातील जातीय सलोखा कायम रहावा, याची काळजी घ्यावी, असे त्यांनी स्पष्ट केले.
सरकारची प्रतिमा सांभाळण्याची जबाबदारी केवळ सरकारवर आहे, असा समज ठेवू नये. ही जबाबदारी संघटना व नेत्यांचीही आहे. त्यामुळे सरकारचे निर्णय, योजना आदी माध्यमातून सरकारची प्रतिमा जनतेपुढे चांगल्याप्रकारे कशी निर्माण होईल, यासाठी प्रयत्न करावेत आणि पक्षाने सरकारच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे, अशा सूचना शहा यांनी दिल्या. पक्षाचे दीड कोटी सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात यावेत, असेही त्यांनी नमूद केले.
© The Indian Express (P) Ltd