मोहनीराज लहाडे
नगर : गेल्या काही महिन्यांपासून लागोपाठ उघडकीस येणाऱ्या धर्मातर, लव्ह जिहादच्या घटनांनी जिल्हा ढवळून निघाला आहे. या संदर्भात गुन्हेही दाखल झाले आहेत. गुन्हे दाखल करण्यात दिरंगाई, तपासात हलगर्जी करणाऱ्या काही पोलीस अधिकाऱ्यांवर निलंबनाची, बदलीची कारवाईही झाली आहे. यातील अनेक घटना विधिमंडळाच्या अधिवेशनात उपस्थित करण्यात आल्या व त्यावर चर्चा झाली, त्यानंतर या विषयावर जिल्ह्यात पडसाद उमटले आहेत. यापूर्वी नेमके उलट घडत होते. एखादा विषय, प्रश्न जिल्ह्यातील भाजप लोकप्रतिनिधी, पदाधिकारी हाताळत, नंतर त्याचे विधिमंडळाच्या अधिवेशनात पडसाद उमटत. परंतु धर्मातर व लव्ह जिहाद प्रकरणात वेगळे घडत आहे.
अधिवेशनात ही प्रकरणे प्रामुख्याने उपस्थित केली आहेत ती भाजपच्याच नेत्यांनी, परंतु नगर जिल्ह्याबाहेरील लोकप्रतिनिधींकडून. भाजपच्या जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींकडून नव्हेत. म्हणजे धर्मातर, लव्ह जिहाद प्रकरणात जिल्ह्यातील भाजपचे मंत्री, आमदार, पदाधिकारी मौन बाळगून असताना नगर जिल्ह्यातील हे प्रश्न अधिवेशनात भाजपचेच जिल्ह्याबाहेरील लोकप्रतिनिधी आवर्जून उपस्थित करताना दिसत आहेत. मुद्दा केवळ अधिवेशनातील चर्चेपुरता मर्यादित नाही. धर्मातर आणि लव्ह जिहाद प्रकरणात जिल्ह्यात होणाऱ्या आंदोलनाचे नेतृत्वही जिल्ह्याबाहेरील नेत्यांकडे सोपवले जाऊ लागले आहे.
अधिवेशनात चर्चा
नगर, श्रीरामपूर येथील प्रकरणात आमदार नितेश राणे यांनी अधिवेशनात चर्चा घडवून आणली. त्यानंतर त्याचे पडसाद जिल्ह्यात उमटले. मोर्चे काढण्यात आले. त्याचे नेतृत्वही आमदार राणे यांनीच केले. राहुरीतील डिसेंबर २०२२ मधील घटनेवर आमदार राम सातपुते यांनी प्रथम अधिवेशनात चर्चा घडवून आणली, त्यानंतर जिल्ह्यातील भाजपचे पदाधिकारी त्यावर बोलायला लागले. असाच प्रकार आता पुन्हा एकदा काही दिवसांपूर्वी राहुरीत घडलेल्या घटनेबाबत झाला. आमदार प्रसाद लाड यांनी हा विषय सध्याच्या अधिवेशनात उपस्थित केला, त्यानंतर जिल्ह्यातील भाजपचे मंत्री आणि पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. असेच प्रकार यापूर्वी आमदार राम कदम, आमदार गोपीचंद पडळकर, महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, माजी खासदार अमर साबळे यांनी हाताळलेल्या नगर जिल्ह्यातील घटनांबाबत झाले आहेत.
निष्ठावंतांमध्ये नाराजी
ही सर्व परिस्थिती भाजपमध्ये घडत असलेल्या बदलावरही बोट ठेवत आहे. गेल्या काही वर्षांत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या नेत्यांची संख्या वाढली आहे. नगर जिल्हाही त्याला अपवाद नाही. सध्या जिल्ह्यातील आमदार राम शिंदे वगळता इतर सर्व लोकप्रतिनिधी इतर पक्षांतून भाजपमध्ये आलेले आहेत. अशीच माजी आमदारांची संख्याही मोठी आहे. भाजप जिल्हा संघटनेत कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांत नव्या-जुन्यांच्या जोरदार संघर्षांची घुसळण सध्या सुरू झालेली आहे. जुन्यांमध्ये डावलले जात असल्याची भावना वाढीला लागली आहे. भाजपमधील या जुन्या पदाधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी पालकमंत्री राधाकृष्ण विखे व त्यांचे चिरंजीव खासदार डॉ. सुजय विखे यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेणारी बैठक घेऊन या अस्वस्थतेची जाणीवही पक्षाच्या वरिष्ठांना करून दिली. नवीन जिल्हाध्यक्ष नियुक्तीतही त्याचे परिणाम दिसले. भाजपमध्ये आलेले अनेक जण सहकार चळवळीतील, साखर कारखानदार, शैक्षणिक संस्थांचे चालक आहेत. भाजपच्या मतांच्या ध्रुवीकरण मोहिमेपासून हे ‘नवे’ अंतर ठेवून आहेत आणि दुसरीकडे जुनेही डावलले जात असल्याच्या भावनेने पक्षातील सक्रियता कमी करू लागले आहेत, अनेक प्रश्नांवर मौन बाळगणे पसंत करू लागले आहेत. त्यातूनच नगर जिल्ह्यातील धर्मातर, लव्ह जिहाद यांसारखे संवेदनशील विषय जिल्ह्याबाहेरील भाजपचे लोकप्रतिनिधी अधिक सक्रियतेने हाताळत असावेत.
विधान परिषदेचा आमदार असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राची जबाबदारी माझ्यावर आहे. आम्ही कोणी बाहेरचे नाहीत. मी विषय उपस्थित केल्याने घटनास्थळी प्रथम भेट देणे ही माझी नैतिकता आहे. राहुरीतील विषयावर मंत्री राधाकृष्ण विखे आमच्या संपर्कात आहेत. पक्षाचे जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकारी अशा संवेदनशील विषय उपस्थित करण्यात सहभागी आहेतच. – प्रसाद लाड, आमदार
जिल्हाध्यक्ष म्हणून माझी अलीकडेच नियुक्ती झाली आहे. जिल्ह्यातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते धर्मातर, लव्ह जिहाद यांसारख्या संवेदनशील विषयांवर आक्रमक आहेत. या संदर्भात आवाज उठवण्यात यापूर्वी दुर्लक्ष झाले असेल तर ते सुधारले जाईल. अशा संवेदनशील विषयाच्या मुळापर्यंत जाऊन त्यातील पीडितांना न्याय देण्यासाठी पक्षाच्या वरिष्ठ पातळीपर्यंत विषय नेला जाईल. – दिलीप भालसिंग, जिल्हाध्यक्ष (दक्षिण), भाजप