पंकजा मुंडे यांना केंद्रात नरेंद्र मोदी सरकारमध्ये महत्त्वाची जबाबदारी देण्यात यावी, या राज्य भाजप नेत्यांच्या मागणीने जोर धरला आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती निधनानंतर राज्यातील मुंडे समर्थक भाजप नेत्यांनी ही इच्छा व्यक्त केली.
महाराष्ट्रातील वरिष्ठ भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांचा राजकीय वारसा पुढे चालवण्याची क्षमता केवळ पंकजा मुंडे-पालवे यांच्या मध्येच असल्याची धारणा या नेत्यांनी व्यक्त केली आहे. पंकजा मुंडे या बीड जिल्ह्यातील परळी विधानसभेच्या आमदार आहेत. ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीबरोबर बीड लोकसभा मतदार संघाची पोट-निवडणूक होणार असून, मुंडे समर्थक भाजप नेत्यांनी पंकजा यांना या मतदार संघामधून केंद्रात पाठवण्यासाठी मोर्चेबांधनी सुरू केली आहे.
पंकजा मुंडे ही जबाबदारी पार पाडण्यास आणि राज्यातील प्रभावी नेतृत्व म्हणून केंद्रात ठसा उमटवण्यास समर्थ असल्याचे भाजपचे ज्येष्ठ नेते सांगत आहेत. पुढील महिन्यात मुंडे कुटुंबीय यावर औपचारीक निर्णय घेणार असल्याचे समजते. “सध्या आम्ही गोपीनाथ मुंडे यांच्या अकाली जाण्याच्या धक्क्यातून स्वत:ला सावरत आहोत. १५ जून नंतर पोट-निवडणूक आणि विधानसभा निवडणुकांवर निर्णय घेतले जातील”. असे एका वरिष्ठ भाजप नेत्याने सांगितले.
राज्य भाजपच्या मध्यवर्ती समितीच्या नेत्यांनी मात्र, पंकजा यांना केंद्रीय राजकारणात घेण्याचा निर्णय पंतप्रधान मोदी यांच्यावर सोडला आहे. “आवश्यकता वाटल्यास मी पुन्हा राज्याच्या राजकारणात येईल आणि पंकजा मुंडे यांच्यावर केंद्रातील जबाबदारी दिली जाईल”. असे वक्तव्य गोपीनाथ मुंडे यांनी देखील लोकसभा निवडणुकीच्या प्रचार मोहिमेदरम्यान केले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp leaders want mundes daughter to play central role