ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक भालचंद्र नेमाडे यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात पेशवे आणि औरंगजेबाबद्दल काही वक्तव्यं केली आहेत. दुसऱ्या बाजीरावाने पेशव्यांच्या तावडीतून महाराष्ट्र वाचवला आणि इंग्रजांकडे सोपवला. औरंगजेब हा हिंदू द्वेष्टा नव्हता. औरंगजेबच्या दोन हिंदू राणींना काशी-विश्वेश्वर मंदिरातील पंडे यांनी मंदिराजवळील भुयारात नेऊन भ्रष्ट केलं होतं. औरंगजेबाच्या दोन्ही बायकांना भ्रष्ट करण्यात आलं म्हणून त्याने मंदिर फोडलं, असं वक्तव्य भालचंद्र नेमाडे यांनी केलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भालचंद्र नेमाडे यांच्या वक्तव्यानंतर नव्या वादाला तोंड फुटलं आहे. भारतीय जनता पार्टीच्या कायदेशीर सल्लागार विभागाने लेखक भालचंद्र नेमाडे यांच्या विरोधातगुन्हा दाखल केला आहे. महाराष्ट्र भाजपाचे सोशल मीडिया कायदेशीर सल्लागार विभागाचे प्रमुख अॅड. अशुतोष दुबे यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली.

हेही वाचा- “पेशवे हे दुष्ट आणि नीच प्रवृत्तीचे होते, कुठेही गेले..”, ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या भालचंद्र नेमाडेंचं वक्तव्य

अॅड. दुबे ट्वीटमध्ये म्हणाले की, “भालचंद्र नेमाडे या लेखकाविरोधात मी भोईवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. नेमाडे यांनी हिंदू ब्राह्मणांना भडकवणारं, ज्ञानवापी प्रकरणी हस्तक्षेप करणारं आणि जनतेला चिथावणी देणारं भाषण केलं आहे. या विधानातून त्यांनी सार्वजनिक सलोखा बिघडवला आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांतर्गत योग्य ती कारवाई करावी.”

औरंगजेब हिंदू द्वेष्टा नव्हता – भालचंद्र नेमाडे

मुंबईतील भाषणात नेमाडे म्हणाले की, औरंगजेबाच्या दोन राण्या हिंदू होत्या, त्यावेळी हिंदू मुसलमान भेद नसायचा. तुम्हाला माहीत आहे की, शाहजानची आईही हिंदू होती. अकबराची बायको हिंदू होती. औरंगजेबाच्या दोन हिंदू राण्या काशी-विश्वेश्वराला गेल्या होत्या. त्या परत आल्याच नाहीत. छावणीतले लोकही म्हणाले, दोन्ही राण्या कुठे गेल्या, ते आम्हाला माहीत नाही. तेव्हा औरंगजेबाला समजलं की काशी विश्वेश्वर मंदिरातील जे पंडे होते, ते तिथे आलेल्या बायकांना एका भुयारात नेऊन भ्रष्ट करायचे. असे पंडे असतील तर त्यांना मारलंच पाहिजे. इतिहासकारांनी अशी नोंद घेतली की औरंगजेब हिंदू द्वेष्टा होता. पंडे हे काही हिंदू होते का? बायकांना भ्रष्ट करणारे? औरंगजेबाच्या दोन्ही बायकांना भ्रष्ट करण्यात आलं म्हणून त्याने मंदिर फोडलं. पुस्तकं वाचूनच हे कळतं. मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालायात तुम्ही आलात पुस्तकं वाचलीत की तुम्हाला खरं काय ते कळेल. बाहेर चाललेलं खोटं असतं. असंही नेमाडे म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp legal team filed fir against writer bhalchandra nemade for comment on aurangazeb peshave and hindu brahmin rmm