दिगंबर शिंदे, सांगली

सांगली जिल्ह्य़ातील  विधानसभेच्या आठपैकी महायुतीने तीन तर महाआघाडीने पाच जागा जिंकल्या. भाजपने हक्काच्या दोन जागा गमावत असताना सांगलीच्या जागेसाठी विद्यमान आमदार सुधीर गाडगीळ यांना झगडावे लागले. सामाजिक न्याय मंत्री सुरेश खाडे यांनी मिरज मतदारसंघामध्ये हॅटट्रिक नोंदवित विजय संपादन केला असला तरी अपेक्षित मताधिक्य मिळविण्यात ते असफल ठरले. शिवसेनेचे आ. अनिल बाबर यांनी खानापूरची जागा कायम राखण्यात यश मिळविले.

सांगली विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपाचे विद्यमान आमदार गाडगीळ यांची लढत काँग्रेसचे पृथ्वीराज पाटील यांच्याशी झाली. त्यांनी काँग्रेसचा अवघ्या सहा हजार मतांच्या फरकाने पराभव करीत निसटता विजय संपादन केला. प्रारंभीच्या फेऱ्यांमध्ये गाडगीळ यांचे मताधिक्य दोन अंकीवर आले होते, अखेरच्या फेरीपर्यंत भाजपला विजयासाठी झगडावे लागले. मतदारांमध्ये निर्माण झालेल्या अंडरकरंट  हवेमुळे महापालिकेची सत्ता हाती असतानाही मताधिक्य मिळविण्यात अपयश आले.  काँग्रेस-राष्ट्रवादीमधील कार्यकर्त्यांनी एकसंघपणे काम केल्याने भाजपला विजय मिळविताना नाकीनऊ आले.

राष्ट्रवादीचे आ. जयंत पाटील यांनी अपेक्षेप्रमाणे इस्लामपूर मतदारसंघामध्ये विजय संपादन केला असला तरी महायुतीकडून मदानात उतरलेले शिवसेनेचे  गौरव नायकवडी आपला करिष्मा दाखवू शकले नाहीत. याउलट नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी या मतदार संघामध्ये दुसऱ्या क्रमांकाची मते घेत लक्ष वेधून घेतले. आ. पाटील यांच्या विरूध्द एकास एक उमेदवार देण्याचे विरोधकांचे प्रयत्न फसल्याने अखेर आ. पाटील यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला.

शिराळा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचे मानसिंगराव नाईक यांनी भाजपचे विद्यमान आमदार शिवाजीराव नाईक यांचा सुमारे २५ हजार मतांनी पराभव करीत मागील पराभवाचे उटे काढले. या मतदारसंघामधून भाजपकडे उमेदवारी मागणारे सम्राट महाडिक यांनी केलेली बंडखोरी आणि शिवाजी केन कारखान्याची देणी यामुळे भाजपची ही जागा अडचणीत आली. मतांची बेरीज करण्यासाठी काँग्रेसचे सत्यजित देशमुख यांचा भाजप प्रवेश फारसा लाभदायक ठरू शकला नाही. वाळवा तालुक्यातील ४८ गावांमध्ये स्वतंत्र गट असलेल्या महाडिकांनी या निवडणुकीत ४६  हजारावर मते मिळविली. याचाही फटका भाजपला बसला.

पलूस-कडेगाव मतदारसंघामध्ये काँग्रेसचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष विश्वजित कदम यांनी एकतर्फी विजय संपादन करीत असताना शिवसेनेच्या संजय विभुते यांच्यापेक्षा तब्बल १ लाख ६२ हजार मताधिक्य मिळविले. या मतदारसंघामध्ये नोटाला २० हजारावर मते मिळाली. यापेक्षा शिवसेनेच्या विभुतेंना मतदान कमी झाले.

तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीच्या विद्यमान आमदार सुमनताई पाटील यांनी शिवसेनेचे अजितराव घोरपडे यांचा दारूण पराभव करीत विजय संपादन केला.

त्यांनी ६४ हजाराहून अधिक मतांनी घोरपडे यांचा पराभव केला. भाजपकडून इच्छुक असताना जागा सेनेच्या वाटय़ाला गेल्यानंतर घोरपडे यांनी शिवबंधन हाती बांधत सेनेची उमेदवारी घेतली. ही बाब कवठेमहांकाळच्या मतदारांना मान्य झाली नाही आणि तासगावकरांनी खासदारही आमचाच आणि आमदारही आमचाच अशी भूमिका घेतली. यामुळे घोरपडे यांना दारूण पराभव पत्करावा लागला.

जतमध्ये भाजपचे विद्यमान आमदार विलासराव जगताप यांचा काँग्रेसचे विक्रम सावंत यांनी ३० हजाराहून अधिक मतांनी पराभव केला. भाजपअंतर्गत डॉ. रवींद्र आरळी यांची बंडखोरी काँग्रेसच्या पथ्यावर पडली. आरळी यांना या २८ हजार ४८५ मते मिळाली.

जतमध्ये जगताप यांच्या विरुध्द तीव्र असंतोष असल्याने जागा अडचणीत असल्याची जाणीव झाल्यानेच येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुराप्पा व उपमुख्यमंत्री लक्ष्मण सउदी यांची सभा घेतली होती. तरीही काँग्रेसने बाजी मारली.

खानापूरमध्ये शिवसेनेचे आ. अनिल बाबर यांनी आपली जागा कायम राखत महाआघाडी पुरस्कृत उमेदवार सदाशिवराव पाटील यांचा २७ हजार मतांनी पराभव केला. स्थानिक पातळीवर असलेला जनसंपर्क बाबर यांना मोलाचा ठरलाच पण त्याचबरोबर आटपाडीतील तानाजी पाटील  आणि राजेंद्र देशमुख यांची साथ मोलाची ठरली.

मिरज या आरक्षित मतदारसंघामध्ये सामाजिक न्याय मंत्री सुरेश खाडे यांचा अपेक्षेप्रमाणे विजय झाला असला तरी अब की बार एक लाख पार ही घोषणा मतदारांनीच मोडीत काढली. ऐनवेळी उमेदवारी गळी पडलेल्या बाळासाहेब व्हनमोरे यांनी स्वाभिमानी पक्षाकडून मदानात उतरून सुमारे ६५ हजार मते मिळवली. निवडणुकीची तयारी नसतानाही त्यांनी मिळविलेली मते उल्लेखनीयच मानली जात आहेत. मोठय़ा मताधिक्याचे स्वप्न घेऊन मदानात उतरलेल्या मंत्री खाडे यांनी विरोधकांना कचरा संबोधण्याची केलेली चूक भाजपला मताधिक्य घटण्यास कारणीभूत ठरली.

Story img Loader