रेल्वे,एसी ट्रॅव्हल्स, खासगी गाड्या भरून राज्यभरातून लाखो कार्यकर्ते भाजपाच्या महामेळाव्यासाठी मुंबईत दाखल झाले होते. हौसे,नवशे अशा सर्वांचा त्यात सहभाग होता. कोणी जीवाची मुंबई करायला गेलं होतं. तर कोणाला नेलं गेलं होतं. ते काहीही असो भाजपानं मातोश्रीच्या बाजूला दणक्यात शक्तीप्रदर्शन केलं. आभासी जगातही त्याची जोरदार चर्चा होती. गावा-गावच्या कार्यकर्त्यांनी घरातून निघल्यापासून बिकेसी मैदानात पोहचेपर्यंतचे फोटो फेसबुकवर अपलोड केले होते. खाल्लं काय? कोणाला भेटलात? कधी पोहचलात ? असं सारं काही कौतुक त्यात होतं.
भाजपाच्या पेड आयटी सेल बरोबरचं शेतकऱ्यांची मुलं देखील स्वयंपूर्तीन हे काम करत होती. दुसरीकडे कळमनुरी तालुक्यातील वाकोडी येथील शेतकरी जगदीश जोशी यांनी बाजारात पपईला भाव नसल्याने दीड एक्कर शेतीवरील संपूर्ण झाडे तोडून टाकल्याचं समोर आलं होतं. जालना येथील शेतकऱ्याची उद्विग्नता फेसबुकमूळे जगासमोर आली. स्वतःच्या हाताने फावड्यानं त्या शेतकऱ्यानं कोबीचा मळा उद्धवस्थ केला. त्यावेळी त्याचा एकच प्रश्न होता. हेच का अच्छे दिन ? घामाला कवडीमोल भाव मिळत असल्याची खंत त्याच्या मनात होती. हेच चित्र औरंगाबादच्या भाजी मंडईत अनेक गावात देखील होतं. भाजीपाल्याला भाव न मिळाल्यानं रस्त्यावर टोम्याटो फेकले होते.जनावरं ती खात होती.
महाराष्ट्राच्या गावागावातून गेलेली गर्दी मुंबईत जमली होती. लाखोंच्या संख्येनं कार्यकर्ते मुंबईत दाखल झाल्यानं सत्ताधारी भाजपाचा महामेळावा झाला. त्याचवेळी बाजारात बेभावात शेतकरी विकला जात होता. खरं तर आठवडा भरापासून गावच्या पारावर, कोपऱ्यावर दोन विषयांची चर्चा होती. एक भाजपाचा महामेळावा आणि दुसरा शेतमालासोबतच भाजीपाल्याचे ढासळलेला भाव. बाजारात शेतकऱ्यांचा भाजीपाला कवडीमोल भावात विकला जात होता.तरी देखील महावेळाव्याला मोठी गर्दी जमली होती. अर्थात ती प्रदेशाध्यक्षांच्या म्हणण्यानुसार बिडी-काडीवर जमवली गेली होती. जेवढी गर्दी जमली होती त्यावरून महाराष्ट्राचा सध्याचा मूड काय? हे ठामपणे सांगणं अवघड आहे. मात्र सरकार शेतकरी विरोधी आहे. असा आरोप विरोधकांकडून केला जातो. शेतमालाचा बाजारभाव पहिला, तर त्या आरोपांमध्ये सत्यता असल्याचं आढळून येतं. मात्र निवडणूक निकाल विरोधाभासी चित्र दाखवतात. अलीकडच्या काळात ग्रामीण महाराष्ट्रात झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपाला बऱ्यापैकी यश मिळालं. याचे दोन अर्थ निघू शकतात. एक जातीच्या राजकारण्यामध्ये शेतकरी समस्यांना किंमत नाही. दुसरा विरोधकांना विश्वास संपादन करता आलेला नाही.
विरोधी पक्षात असताना सोयाबीनला भाव मिळावा या संदर्भात आक्रमकपणे मागणी करतानाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची व्हिडीओ अलीकडच्या काळात किल्प जोरदार व्हायरल झाली. मात्र सत्तेत असलेल्या भाजपा सरकारनं त्याची दखल घेतली नाही. कधी काळी मुख्यमंत्र्यांनी मागणी केलेली असताना देखील सोयाबीनचा भाव काही वाढला नाही. कापसावर बोनड आळी पडल्याने शेतकरी कोलमडला. मात्र अद्याप त्याला सावरण्यात आलेलं नाही.राज्यातील शेतकऱ्यांकडून कृषी उत्पन्न बाजार समिती, खरेदी विक्री संघ, मार्केटींग फेडरेशन यांच्यामार्फत नाफेडने तुरीची खरेदी केली होती. मात्र आजपर्यंत या शेतकऱ्यांना तुरीचे पैसे मिळाले नाहीत. ऑनलाईन कर्जमाफीची मुदत निवडणुकीपर्यंत वाढत जात आहे. निवडणुका तोंडावर आल्यावर तरी सरकार दिलेला शब्द पाळेलं.पण कर्जमाफीच्या ऑनलाईन घोळात यावर्षी कर्जवीतरण झालेलं नाही. त्यामुळे पाऊस झालेला असताना देखील अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत. मात्र जोपर्यंत शेतकऱ्याला स्वतःच्या मताची किंमत कळणार नाही. तोपर्यंत लाखोंच्या संख्येनं असे महामेळावे होत राहतील. शेतकरी मात्र बेभाव विकला जाईल. फक्त भाव करणाराचा चेहरा बदललेला असेल…
BLOG: भाजपाचा महामेळावा आणि बेभाव शेतकरी !
रेल्वे,एसी ट्रॅव्हल्स, खासगी गाड्या भरून राज्यभरातून लाखो कार्यकर्ते भाजपाच्या महामेळाव्यासाठी मुंबईत दाखल झाले होते. हौसे,नवशे अशा सर्वांचा त्यात सहभाग होता. कोणी जीवाची मुंबई करायला गेलं होतं. तर कोणाला नेलं गेलं होतं.
Written by आप्पासाहेब शेळके
First published on: 07-04-2018 at 11:31 IST
Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp maha melava mumbai