समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर मनसेचे नेते अमित ठाकरे यांचं वाहन काही काळ थांबवून ठेवल्याच्या कारणावरून मनसैनिकांनी रविवारी ( २३ जुलै ) मध्यरात्री टोलनाक्याची तोडफोड केली होती. अमित ठाकरे शिर्डीहून येत असताना सिन्नर तालुक्यातील गोंदे टोल नाक्यावर हा प्रकार घडला. यावरून भाजपाने अमित ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. टोल फोडणे म्हणजे राजकारण नाही. कधीतरी बांधायला शिका आणि शिकवा, असा हल्लाबोल भाजपाने अमित ठाकरेंवर केला आहे.
भाजपा महाराष्ट्रच्या ट्वीटर अकाऊंटवरून एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यातून अमित ठाकरेंना लक्ष्य केलं आहे. “आमचं सरकार दादागिरी चालू देणार नाही,” असा इशारा व्हिडीओच्या माध्यमातून भाजपाने दिला आहे.
हेही वाचा : पृथ्वीराज चव्हाण यांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून शिंदे गटातील आमदाराने सुनावलं; म्हणाले, “आमच्या घरात…”
व्हिडीओत काय?
भाजपाने व्हिडीओत म्हटलं की, “राज ठाकरे आणि टोल नाका यांचं जुनं नातं महाराष्ट्राला माहिती आहे. त्यात अमित ठाकरे यांची गाडी सिन्नरमधील टोलनाक्यावर तीन ते साडेतीन मिनिटे थांबवण्यात आली. फास्टटॅग संबंधी कारणामुळे गाड्या अडवण्यात येत होत्या. त्यामुळे अमित ठाकरे यांचीही गाडी थांबवण्यात आली. अमित ठाकरे यांची गाडी अडवल्यामुळे मनसे कार्यकर्ते भडकले आणि त्यांनी टोलनाक्याची तोडफोड केली.”
“याबाबत अमित ठाकरे यांना समजल्यावर त्यांच्या तोंडावरील आसुरी आनंद लपवता आला नाही. माध्यमांशी बोलताना अमित ठाकरे यांनी दहा मिनिटे थांबवल्याचं खोट विधान केलं. पण, तीन मिनिटे थांबवल्यानंतर दहा मिनिटे सांगून कार्यकर्त्यांना टोल फोडण्यास भाग पाडलं,” असे भाजपाने म्हटलं आहे.
“कर्तव्य बजावत असताना विचारपूस करणं ही टोल नाका कर्मचाऱ्यांची चूक नक्कीच नव्हती. पण, मनसे कार्यकर्त्यांचा आततायीपणा त्यांनाच भोवला. लक्षात ठेवा, हे सरकार जनसामान्यांचं सरकार आहे. कोणा एकासाठी किंवा त्यांच्या मुलासाठी वेगळे नियम पाळले जाणार नाही. तसे केलं तर प्रामाणिकपणे टोल भरणाऱ्या प्रत्येकाची प्रतारणा होईल, ते आम्हाला मान्य नाही,” असेही भाजपाने सुनावलं आहे.
हेही वाचा : “एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहणार”, फडणवीसांच्या विधानावर राऊतांची सूचक प्रतिक्रिया; म्हणाले, “सूर्य…”
“‘राज ठाकरेंमुळे ६५ टोल नाके बंद पडले, तर माझ्यामुळे एक बंद झाला,’ असं अमित ठाकरे म्हणाले. पण, अमित ठाकरे हा टोल नाका बंद पडला नाही. तुम्ही नियमाप्रमाणे टोल भरला नाही. मात्र, आमचं सरकार दादागिरी चालू देणार नाही,” असा इशारा भाजपाने अमित ठाकरेंना दिला आहे.