सांगली : महायुतीमध्ये भाजपा हा मोठा भाऊ आहे. कुटुंब किंवा आघाडीमध्ये मोठ्या भावाने एक पाऊल मागे घेणे ही पूर्वीपासून भाजपाची भूमिका आहे, त्यात वावगे काहीच नाही असे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी तासगाव येथे बोलतांना व्यक्त केले. श्री बावनकुळे म्हणाले, सरकारमध्ये असणाऱ्या लोकप्रतिनिधींची कामे आता होत आहेत. लवकरच राज्य मंत्रीमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे, असे झाले तर १४-१५ मंत्री वाढतील आणि पालकमंत्री देखील वाढतील, सरकारी कामे व योजनांना गती मिळेल.
हेही वाचा >>> “…आता मला जेवण जाणार नाही”, ‘त्या’ प्रश्नावर नारायण राणेंचा संताप
प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी तासगाव येथे तासगाव, जत व खानापूर-आटपाडी विधानसभा मतदार संघातील प्रमुख कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी पालकमंत्री सुरेश खाडे, खासदार संजयकाका पाटील, प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, आ. गोपीचंद पडळकर, पश्चिम महाराष्ट्र संघटनमंत्री मकरंद देशपांडे, ग्राणीण जिल्हाध्यक्ष निशिकांतदादा पाटील, शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, लोकसभा निवडणूक प्रमुख दीपक शिंदे, शेखर इनामदार, सत्यजित देशमुख, प्रभाकर पाटील, रवी पाटील, अमरसिंह देशमुख, डॉ. रवींद्र आरळी यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. प्रदेशाध्यक्षांनी त्यांच्या प्रवासात तासगाव येथे तासगाव-कवठे महांकाळ, जत व खानापूर आणि दुपारी मिरज येथे मिरज, सांगली व पलूस-कडेगाव या विधानसभा क्षेत्रातील प्रमुख पदाधिकारी तसेच ‘सुपर वॉरिअर्स’ यांच्याशी संवाद साधला. सुपर वॉरिअर्सच्या मेहनतीतून पुन्हा एकदा सांगलीचा खासदार पंतप्रधान श्री मोदींच्या समर्थनात उभा राहील असा विश्वास व्यक्त केला. तासगाव येथे गणपती मंदिर ते बागणे चौकपर्यंत आणि मिरज येथे ते ‘घर चलो अभियानात सहभागी झाले. त्यांनी व्यापारी व छोट्या विक्रेत्यांशी संवाद साधला.