२०१९ ची विधानसभा निवडणूक, त्यानंतर निर्माण झालेली परिस्थिती, पहाटेचा शपथविधी, महाविकास आघाडी आणि त्यानंतर २०२२ झालेलं सत्तांतर. शिवसेना २०२२ मध्ये तर राष्ट्रवादी काँग्रेस २०२३ मध्ये फुटणं या घटना महाराष्ट्राच्या राजकारणाच्या इतिहासात कधीही विसरल्या जाणार नाहीत. देवेंद्र फडणवीस यांनी ज्या प्रकारे पुन्हा एकदा सत्ता आणली त्यांची ती खेळीही महाराष्ट्राच्या लक्षात राहण्यासारखीच ठरली आहे. या सगळ्या ज्या घडामोडी आपण पाहिल्या त्यात एक गोष्ट आणखी महत्त्वाची ठरली. ती म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी २०१९ च्या निवडणुकीच्या आधी म्हटलेली ‘मी पुन्हा येईन’ ही कविता. आता हीच कविता भाजपा महाराष्ट्राने पोस्ट केली आहे. त्यामुळे विविध चर्चा सुरु झाल्या आहेत.
काय आहे देवेंद्र फडणवीस यांची ती कविता?
“मी पु्न्हा येईन. याच ठिकाणी, याच निर्धाराने, नवमहाराष्ट्राच्या निर्मितीसाठी. मी पुन्हा येईन गावांना जलयुक्त करण्यासाठी, शहरांचा चेहरा बदलण्यासाठी, माझ्या महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी. नवमहाराष्ट्राच्या निर्मितीसाठी!” भाजपा महाराष्ट्राने ही कविता काही वेळापूर्वीच पोस्ट केली आहे. ज्यावरुन विविध चर्चा आता सुरु झाल्या आहेत. पुढचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील का? समजा अपात्रतेचा निर्णय झाला तर पुढचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होतील का? एक-ना दोन चर्चा सुरु झाल्या आहेत. इतकंच नाही तर महाराष्ट्र भाजपाने ही कविता पोस्ट केल्यानंतर त्यातल्या उत्तरांमध्येही लोक विविध प्रतिक्रिया देत आहेत. काही युजर्स तर शपथविधी सोहळा कधी आहे? असाही प्रश्न विचारत आहेत.
मी पुन्हा येईन हे कवितेतलं वाक्य २०१९ च्या प्रचारसभेत प्रचंड गाजलं होतं. त्यानंतर जेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत आणि महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हा उद्धव ठाकरे, शरद पवार, जयंत पाटील यांच्यासह अनेकांनी ‘मी पुन्हा येईन’ या ओळीची खिल्ली उडवली. मात्र अडीच वर्षांनी जेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले तेव्हा या खिल्लीवर त्यांनी त्यांच्या खास नागपुरी खुमासदार शैलीत उत्तर दिलं होतं.
उपमुख्यमंत्री झाल्यानंतर ‘मी पुन्हा येईन’ खिल्लीबाबत काय म्हणाले होते फडणवीस?
” ‘मी पुन्हा येईन’ ही कविता म्हटली होती तेव्हा माझी खूप टिंगल टवाळी अनेकांनी केली. पण मी आलो आणि यांनाही (एकनाथ शिंदे) घेऊन आलो. ज्यांनी माझी टिंगल टवाळी केली आणि अपमान केला त्यांचा मी बदला घेणार आहे. माझा बदला एवढाच आहे की मी त्यांना माफ केलं. राजकारणात अशा गोष्टी मनावर घ्यायच्या नसतात. हर एक मौका आता है! दुनिया के सारे शौक पाले नहीं जाते. काँच के खिलौने उछाले नहीं जाते..कोशीशे करनें से जीत होती है आसान क्यूँ की हर काम तकदीर के भरोसे टाले नहीं जाते. असा शेरही त्यांनी म्हटला होता. अशात आता देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत पुन्हा एकदा सूचक व्हिडीओ पोस्ट केला गेल्याने पुन्हा एकदा ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार का? याचीच चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.