शनिवारी राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात पावसानं थैमान घातलं. सीताबर्डी व आसपासच्या भागात मोठ्या प्रमाणावर पाणी शिरलं. यामुळे नागपूरच्या काही भागांत पूरसदृश स्थिती दिसून आली. अनेक नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे वित्तहानी मोठ्या प्रमाणावर झाल्याचं सांगितलं जात आहे. झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी नागपूरच्या या भागाची पाहणी केली. यावेळी घडलेल्या एका प्रसंगाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवरून एकीकडे विरोधकांकडून फडणवीसांवर अरेरावी केल्याची टीका केली जात असताना आता भाजपानं या प्रसंगाचा दुसरा व्हिडीओ ट्वीट करत विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.
नेमकं काय घडलं?
देवेंद्र फडणवीस रविवारी नागपूरच्या ज्या भागात पाणी शिरलं होतं, त्या भागाची पाहणी करण्यासाठी दाखल झाले. यावेळी गर्दीत एक माणूस त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असताना त्यांनी त्या व्यक्तीला हातानं ओढून घेतल्याचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. काँग्रेसनं यावरून फडणवीसांना लक्ष्य केलं आहे. “पावसाच्या पाण्याने झालेल्या नुकसानाची माहिती सांगणाऱ्या नागरिकांसोबत अहंकारी फडणवीसांची अरेरावी. हीच काय आपल्या मतदारांशी वागण्याची पद्धत? याला सत्तेचा माज नाही तर आणखीन काय म्हणणार?” असा प्रश्न महाराष्ट्र काँग्रेसनं उपस्थित केला आहे.
दरम्यान, काँग्रेसनं टीका सुरू केल्यानंतर त्यावर भाजपानं प्रत्युत्तर दिलं आहे. यासाठी महाराष्ट्र भाजपाच्या अधिकृत ट्विटर हँडलवर या प्रसंगाचा मोठा व्हिडीओ ट्वीट करण्यात आला असून त्यावरून काँग्रेसला लक्ष्य करण्यात आलं आहे.
सुनावणी आजपासून; आमदार अपात्रता याचिका अखेर मार्गी, तीन ते चार महिने लागण्याची शक्यता…
“उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपुरातील पूरग्रस्त भागांना भेट दिली. त्यावेळी सदर व्यक्ती आणि इतर अनेकांची इच्छा होती की देवेंद्र फडणवीसांनी आपल्याही घरी यावे. नागपुरातील प्रत्येकाचेच प्रेम असल्याने आपला नेता घरी यावा, अशी त्यांची इच्छा असण्यात गैर नाही. पण, प्रत्येकाच्या घरी जाणे नेत्यालाही शक्य होतेच असे नाही. पोलिस त्याला थांबवित असल्याने, देवेंद्र फडणवीस यांनी त्याचा हात धरुन गर्दीतून त्याला आपल्या जवळ घेतले आणि ‘चल बाबा तुझ्याही घरी येतो’, असे म्हटले आणि ते त्याचा हात धरुन त्याच्या घरी गेलेही”, असं या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
“हा नालायकपणाचा कळस”
“अशा घटनेचे राजकारण कुणी करावे, तर जे कधीच जनतेत जात नाही त्यांनी. हा प्रकार किळसवाणा आणि नालायकपणाचा कहर आहे. उद्धव ठाकरे आणि काँग्रेस यांनी विरोधी पक्षाचे रचनात्मक कार्य सोडून ‘ट्रोलिंग गँग’चे काम स्वीकारले, त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन! राज्यातील जनतेने नाकारल्याने आता तसेही तुम्हाला त्याशिवाय दुसरा कामधंदाही उरला नाही. त्यामुळे लगे रहो!” असंही या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.