वर्धा : आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी म्हणून प्रदेश भाजपाने आज विशेष कार्यशाळेचे आयोजन केले आहे. भिवंडी येथील एका रिसॉर्टमध्ये ही कार्यशाळा सुरू असल्याचे वृत्त अखेर बाहेर आले आहे. ही कार्यशाळा गोपनीय म्हणून सर्वांना प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी खबरदार केले होते.
या कार्यशाळेत सर्व आमदार, खासदार, जिल्हाध्यक्ष तसेच महत्त्वाचे पुढारी सहभागी झाले आहेत. राष्ट्रीय सचिव व महाराष्ट्र प्रभारी सी.टी. रवी हे मुख्य मार्गदर्शक आहेत. दिवसभर विविध सत्र चालणार आहेत. वर्धा येथून खासदार रामदास तडस, आमदार सर्वश्री डॉ. पंकज भोयर, समीर कुणावर, रामदास आंबतकर, दादाराव केचे, निवडणूक प्रभारी राजेश बकाने उपस्थित असल्याचे जिल्हाध्यक्ष सुनील गफाट यांनी सांगितले.
हेही वाचा – भंडारा : डबे सोडून रेल्वे इंजिन निघाले सुसाट; सुदैवाने मोठा अनर्थ टळला
आगामी लोकसभा निवडणुकीत संभाव्य उमेदवार तसेच विद्यमान खासदार यांच्याबाबत उहापोह होणार असल्याचे समजते. लोकसभा क्षेत्रात असणाऱ्या विधानसभा मतदारसंघात कुठे कमी पडतो, त्याची पण झाडाझडती होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष हे उपस्थितांना संबोधनार आहेत.