नाशिक पदवीधर मतदारसंघातून काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉ. सुधीर तांबे यांनी अचानक माघार घेऊन सर्वांनाच धक्का दिला. त्यांच्याऐवजी त्यांचा मुलगा सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. यानंतर आता भाजपाकडूनही मोठी बातमी समोर येत आहे. सत्यजीत तांबे यांनी पाठिंबा मागितल्यास आम्ही देऊ, अशी भूमिका भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी घेतल्यामुळे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक रंजक बनली आहे. तसेच काँग्रेसने एबी फॉर्म देऊनही आणि ते डॉ.सुधीर तांबे वर्तमान आमदार असूनही त्यांनी एबी फॉर्म का भरला नाही? याचे उत्तर तेच देऊ शकतात, असेही बावनकुळे यावेळी म्हणाले.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलत असताना नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. “भाजपातर्फे राजेंद्र विखे पाटील यांच्या नावाचाच विचार आम्ही करत होतो. राधाकृष्ण विखे पाटील यांनीच त्यासाठी पुढाकार घेतला होता. पण मागच्या सहा महिन्यांपूर्वी उमेदवारी जाहीर झाली असती तर तयारीला वेळ मिळाला असता, अशी भूमिका राजेंद्र विखे पाटील यांनी मांडली आणि निवडणूक लढविण्यास असमर्थता दर्शविली. आता आम्हाला दिसतंय की, ही अपक्ष निवडणूक होईल. भाजपाने अजून कुणालाही एबी फॉर्म दिलेला नाही. त्यामुळे सत्यजीत तांबे यांनी भाजपाकडे पाठिंबा मागितल्यास विचार करु”, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
भाजपकडे कुणीही उमेदवारी मागितली नाही
नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी विखे पाटील यांच्यानंतर उमेदवार मिळावा यासाठी आम्ही चाचपणी केली. पण कुणीही उमेदवारी मागितली नाही. त्यामुळे आम्ही कुणालाही एबी फॉर्म दिला नाही. सत्यजीत तांबे यांनी आज तरी आमच्याकडे पाठिंबा मागितला नाही, पण जर त्यांनी भूमिका घेतली तर त्याला आम्ही प्रतिसाद देऊ.
हे ही वाचा >> “…म्हणून मी माझ्या नावाचा एबी फॉर्म असतानाही सत्यजीत तांबेंचा अर्ज भरला”, सुधीर तांबेंनी सांगितलं कारण
राजकारणात एक आणि एक अकरा करायचे असतात
“देशात आणि राज्यात दिल्लीपासून गल्लीपर्यंत आमचे सरकार असले तरी काही ठिकाणी आम्ही कमजोर आहोत. हे मान्य करतो. सहकार क्षेत्र, शिक्षक मतदारसंघ यात आम्ही कमजोर आहोत. राजकारणात एक आणि एक अकरा झाले पाहीजेत. तिथे एक आणि एक दोन होत नाही. ज्याठिकाणी आम्ही नाही आहोत, तिथे स्पेश निर्माण करण्यााचा प्रयत्न आम्ही करणारच. नागपूरमध्ये आमचा उमेदवार होता म्हणून आम्ही तिथे दिला. ज्याठिकाणी आम्ही कमजोर आहोत, त्याठिकाणी एक आणि एक अकरा करावेच लागते.”, अशी प्रतिक्रिया बावनकुळे यांनी दिली.