नांदेड : नांदेडसह शेजारच्या तीन जिल्ह्यांतील २२ विधानसभा मतदारसंघांपैकी केवळ २ मतदारसंघांतच भाजपाच्या प्राथमिक सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याची माहिती शुक्रवारी येथे झालेल्या पक्षाच्या विभागीय बैठकीतून समोर आली.नवीन वर्षात म्हणजे १ जानेवारीपासून महाराष्ट्र भाजपामध्ये पक्ष सदस्य नोंदणी अभियान सुरू झाले असून १० फेब्रुवारीपर्यंतच्या निर्धारित मुदतीत मतदारसंघनिहाय झालेल्या सदस्य नोंदणीची माहिती पक्षाच्या प्रदेश शाखेनेच जारी केली आहे. मराठवाडा विभागातील सदस्य नोंदणीचे एकंदर चित्र स्पष्ट झाल्यानंतर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नूतन कार्याध्यक्षांना सोबत घेत आधी नांदेड आणि मग छत्रपती संभाजीनगर येथे विभागीय बैठकांत संघटनात्मक कार्याचा जिल्हानिहाय आढावा घेतला.
वरील बैठकीच्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यातील प्राथमिक सदस्य नोंदणीचा अहवाल गुरूवारीच बाहेर आला होता. त्यानंतर लातूर, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांतील विधानसभा मतदारसंघांतल्या सदस्य नोंदणीची माहिती बैठकीदरम्यान समोर आली. वरील २२ मतदारसंघांपैकी १० मतदारसंघांमध्ये भाजपाचे आमदार असून नायगाव (जि.नांदेड) आणि औसा (लातूर) या दोन मतदारसंघांमध्येच उद्दिष्टापेक्षा जास्त सदस्य नोंदणी झाल्याचे दिसून आले.
वरील चार जिल्ह्यांत मतदारसंघनिहाय झालेली भाजपा सदस्य नोंदणीची आकडेवारी अशी. कंसातील आकडे उद्दिष्टाचे. किनवट – ४४८१३ (उद्दिष्ट ः ६६२००), हदगाव – २३४३२ (६७४००), भोकर – ५८२७४ (६८८००), नांदेड उत्तर – ३५४४८ (७१८००), नांदेड दक्षिण – २५९७३ (६२४००), लोहा – २६४५२ (६७६००), नायगाव – ८०७९७ (७००००), देगलूर – २३४५६ (७०२००), मुखेड – ४४९९२ (७३२००), वसमत – ९३३१ (६५४००), कळमनुरी – ११०५१ (६९०००), हिंगोली – ३१४८९ (६८६००), जिंतूर – ५८७७१ (८७६००), परभणी – २४२५६ (६७६००), गंगाखेड – २९९९५ (८६४००), पाथरी – १२१९३ (८३०००), लातूर ग्रामीण – १६९५० (७२६००), लातूर शहर – ३९०२८ (६७६००), अहमदपूर – १६३२३ (७५२००), उद्गीर – २२०७५ (७१८००), निलंगा – २१९३४ (६९४००), औसा – ८५८०३ (६१८००).
महाराष्ट्रात भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतर पक्षाची विभागीय बैठक प्रथमच नांदेडमध्ये घेण्यात आली. या बैठकीत सहभागी होण्यासाठी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे शुक्रवारी सकाळी नागपूरहून येथे आगमन झाले. पक्षाच्याच राज्यमंत्री मेघना बोर्डीकर परभणीहून स्वतंत्रपणे आल्या होत्या. पक्षाचे आजी-माजी आमदार तसेच विविध जिल्ह्यांतील पदाधिकारी बैठकीच्या निमित्ताने नांदेडला एकत्र जमले होते. राज्यसभा सदस्य अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे नांदेड महानगराध्यक्ष अमरनाथ राजूरकर यांनी या बैठकीचे नियोजन केले होते. बावनकुळे यांच्या आगमनानिमित्त नांदेडमधील शिवाजीनगर ते राज कॉर्नर आणि विमानतळ ते भक्ती लॉन्स या सुमारे १० कि.मी. अंतरावर जागोजागी स्वागत फलक आणि पक्षाचे झेंडे लावून वातावरण निर्मिती करण्यात आली होती.