Jaykumar Gore On Sharad Pawar : भारतीय जनता पक्षाचे नेते तथा राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘मी मंत्री झालो, पण हे शरद पवारांना अजूनही मान्य होत नाही, असं म्हणत राजकारण संपलं तरी चालेल, पण मी पवारांच्या पुढे कधीही झुकणार नाही’, असं मंत्री जयकुमार गोरे यांनी एका कार्यक्रमात बोलताना म्हटलं आहे.

मंत्री जयकुमार गोरे काय म्हणाले?

“ज्या लोकांवर माझ्या माण खटावच्या मातीने, जिल्ह्याने प्रचंड प्रेम केलं अशा बारामतीच्या लोकांना सर्वात आधी कळ लागली की हा सामान्य कुटुंबातील व्यक्ती आहे. हा साधा माणूस आमदार कसा होऊ शकतो. मी आमदार झालो हे त्यांनी १० वर्ष मान्य केलं नाही. आता आमदार झालो हे मान्य झालं, पण मंत्री झालो हे मान्य होत नाही. आजपर्यंत सर्व नेत्यांनी त्यांच्याबरोबर तडजोड केली असेल, पण या पश्चिम महाराष्ट्रातील मी एकमेव व्यक्ती आहे कधीही पवारांच्या पुढे झुकलो नाही आणि कधी झुकणारही नाही, माझं राजकारण संपलं तरी चालेल”, असं मंत्री जयकुमार गोरे यांनी म्हटलं आहे.

“बारामतीच्या पुढे कधीही झुकलो नाही. बारामतीच्या पुढे झुकलो असतो तर माझी आमदारकी सोपी झाली असती. मात्र, आपल्या शेतात पाणी आलं नसतं. मी त्यांची गुलामगिरी स्वीकारली असती तर माण खटावच्या मातीत पाणी आलं नसतं. आज माण खटावच्या मातीत जी विकासाची गंगा वाहते ती कधीही वाहिली नसती. कारण बारामतीच्या दारात जाऊन बसण्याशिवाय माझ्या हातात काही राहिलं नसतं. मी एकमेव व्यक्ती आहे कधीही बारामतीची पायरी देखील चढलो नाही”, असंही मंत्री जयकुमार गोरे म्हणाले.

“माझा विरोध त्यांना नाही, बारामतीला देखील माझा विरोध नाही. माझा विरोध हा ज्यांनी या मातीला, माण खटावला पाण्यापासून वंचित ठेवलं त्यांना माझा विरोध आहे. माझी लढाई ही माझ्या मातीच्या स्वाभिमानासाठी आहे. माझा विरोध बारामतीला किंवा पवारांना नाही”, असंही जयकुमार गोरे यांनी म्हटलं आहे.