विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. अधिवेशनात विरोधकांकडून विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांना उत्तरे देताना नवनिर्वाचित मंत्र्यांची चांगलीच धांदल उडत आहे. राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनाही असाच अनुभव आला. विरोधकांचा प्रश्नाच्या भडीमारामुळे भांभावलेल्या लोढांनी जरा दमानं घेण्याचं आवाहन विरोधकांना केलं. लोंढांच्या या वक्तव्यानंतर सभागृहात एकच हशा पिकला.
अन् विरोधकांच्या प्रश्नावर मंगलप्रभात लोढा भांभावले
प्रश्नोत्तराच्या तासात काँग्रेस आमदार अभिजीत वंजारी यांनी मंगलप्रभात लोढांना प्रश्न विचारला होता. या प्रश्नाला उत्तर देताना लोढांची चांगलीच दमछाक झाली. अपुऱ्या माहितीमुळे लोढांना या प्रश्नाचे नीट उत्तर देता येईना. अखेर लोढांनी सभापतींना साद घालत मदतीची मागणी केली. “सभापती महोदय, एक तर मी नवीन प्लेअर आहे. तरीही तुम्ही सगळे मिळून मला बाऊंन्सरवर बाऊंन्सर टाकत आहात, आता जरासं थांबा, दमानं घ्या. तुमच्या सर्व प्रश्नांवर मी सविस्तर उत्तर देईन”, असं आश्वासन लोढांनी दिले.
हेही वाचा- “कंबोज हे काजू, बदाम आणि खारका खाऊन…” अजित पवारांच्या कामांचा उल्लेख करत मिटकरींची टीका, म्हणाले…
विनायक मेटेंच्या अपघाताची चौकशी करण्याची विरोधी पक्षाची मागणी
मराठा समाजाचे नेते, माजी आमदार विनायक मेटे यांच्या गाडीला पुणे-मुंबई द्रूतगती महामार्गावर झालेल्या अपघाताबद्दल कुटुंबियांसह अनेकांकडून शंका व्यक्त केल्या जात असून त्यांचे निरसन होण्यासाठी या दुर्घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये आज शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूचा विषय चर्चेला आला त्यावेळी विरोधी पक्षनेत्यांनी ही मागणी केली.