राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी हा राजीनामा मंजूर केला आहे. रमेश बैस हे महाराष्ट्राचे नवे राज्यपाल असणार आहेत. अलीकडेच भगतसिंह कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पायउतार होण्याची इच्छा व्यक्त केली होती. भगतसिंह कोश्यारींच्या राजीमान्यानंतर विविध राजकीय प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंनी यावर भाष्य केलं आहे.
“भगतसिंह कोश्यारी महाराष्ट्राचे राज्यपाल झाल्यापासून राजभवनात बसून राजकारभार हाकणे ऐवढंच नाही, तर ग्रामीण भागातील लोकांच्या समस्या सोडवण्याचं काम केलं. महाविकास आघाडीला हे काम पसंत नव्हतं. म्हणून महाविकास आघाडीने सातत्याने त्यांच्यावर आरोप केले. पण, आपल्या मूळ गावाकडे सामाजिक काम करण्याची इच्छा व्यक्त करत राज्यपालांनी राष्ट्रपती आणि पंतप्रधानांकडे जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती केली होती,” असं दानवेंनी सांगितलं.
राज्यपालांवर १२ आमदारांच्या नियुक्त्या रखडवल्याचा आरोप करण्यात येतो, याबद्दल विचारलं असता रावसाहेब दानवे म्हणाले, “१२ आमदारांच्या नियुक्त्यांसाठी राज्यपालांना दोष देणं चुकीचं आहे. पण, काँग्रेसच्या काळात राज्यपालांच्या शिफारसीवर राज्य सरकारे बरखास्त करण्यात आली होती. मात्र, त्याबद्दल कोण बोलण्यास तयार नाही,” अशी टीका रावसाहेब दानवेंनी काँग्रेसवर केली आहे.