Vijaykumar Gavit Statement on Aishwarya Rai: राजकीय नेतेमंडळी त्यांच्या वक्तृत्वशैलीमुळे अनेक सभा-कार्यक्रमांमधून उपस्थितांना आपल्या भूमिका मान्य करायला भाग पाडत असतात. यातून उपस्थितांचं अनेकदा मतपरिवर्तनही होतं. मात्र, बऱ्याचदा अशा सभांमधून केलेल्या भाषणात राजकीय नेतेमंडळी काही वादग्रस्त विधानं करून जातात. ही विधानं चर्चेत आल्यानंतर त्यावर आपण तसं काही बोललोच नव्हतो असं म्हणतात किंवा त्यावर दिलगिरी व्यक्त करत विधानं मागेही घेतात. या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्र सरकारमधील भाजपाचे मंत्री विजयकुमार गावित यांनी केलेलं एक विधान चांगलंच चर्चेत आलं आहे. टीव्ही ९ नं यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.
माशांचं सेवन आणि ऐश्वर्या रायचे डोळे
आधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असतानाही विविध मंत्रीपदं भूषवलेल्या विजयकुमार गावित यांना भाजपात प्रवेश केल्यानंतर तब्बल सहा वर्षांनी राज्यात मंत्रीपद मिळालं. नव्या सरकारमध्ये विजयकुमार गावित यांना आदिवासी विकास खात्याचं मंत्रीपद देण्यात आलं. विजयकुमार गावित यांनी एका जाहीर कार्यक्रमात केलेल्या भाषणामुळे ते चर्चे आले आहेत. “नियमित मासे खाल्ल्यामुळेच ऐश्वर्या रायचे डोळे सुंदर झाले” असं ते म्हणाले आहेत.
नेमकं काय म्हणाले विजयकुमार गावित?
उपस्थित श्रोत्यांना माशांच्या सेवनाचे फायदे सांगताना विजयकुमार गावित यांनी थेट अभिनेत्री ऐश्वर्या रायचा उल्लेख केला. “तुम्ही ऐश्वर्या राय बघितली ना? त्यांनी काही सांगितलं की नाही ऐश्वर्या रॉयबद्दल? ती समुद्राच्या किनारी राहणारी. बेंगलोरची समुद्राच्या किनारी राहणारी. ती दररोड मासे खायची. बघितले ना तिचे डोळे? तसे तुमचेही डोळे होणार. हाही एक फायदा आहे”, असं विजयकुमार गावित यावेळी म्हणाले.
“…तर बाईमाणूस चिकनी दिसायला लागतात”
दरम्यान, यावेळी गावित यांनी केलेलं आणखी एक विधानही वादात सापडण्याची शक्यता आहे. “मासे खाल्ले ना, तर दोन फायदे आहेत. मासे खाल्ले तर बाईमाणूस चिकनी दिसायला लागतात”, असं गावित म्हणाले. “डोळेपण तरतरीत दिसतात. कुणीही बघितलं तरी पटवूनच घेणार. आपली त्वचाही चांगली दिसते. त्यात एक प्रकारचं तेल असतं. त्या तेलामुळे डोळ्यांवर परिणाम होतो. माशाच्या तेलामुळे शरीराची त्वचाही चांगली दिसते”, असंही गावित यांनी नमूद केलं.