महाराष्ट्र विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी (आज, २८ फेब्रुवारी) विधानसभेत मोठा गोंधळ पाहायला मिळाला. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा आणि आमदार वर्षा गायकवाड यांनी मुबईच्या विकासकामांवरून सरकारला काही प्रश्न विचारले होते. तसेच मुंबईतल्या अनेक जमिनी विकासकामांच्या नावाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मित्र आणि प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदाणी यांना दिल्या जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. गायकवाड यांच्या या वक्तव्यानंतर भाजपा आमदारांनी सभागृहात गोंधळ घालण्यास सुरुवात केली. तसेच भाजपा आमदारांनी थेट काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वर्षा गायकवाड म्हणाल्या, आपली मुंबई ही मुंबईच राहिली पाहिजे. कोणीही आपल्या मित्रांना मदत करू नये. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चैत्यभूमीचा विकास झाला आहे. तसेच काही लोकांनी आपल्या मित्रांची मदत करणं बंद करावं. सध्या मुंबईतली प्रत्येक गोष्ट विकली जात आहे. मुंबईतले स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स विकले गेले आहेत. गेल्या दीड वर्षांत आम्ही काही पाहिलं असेल तर तो म्हणजे मित्र काळ. मित्रांना कशी मदत करता येईल, त्यांना टेंडर कसं देता येईल तेवढंच पाहिलं आहे.

आमदार वर्षा गायकवाड म्हणाल्या, वांद्रे येथील जमिनी बळकावल्या जात आहेत. मुलुंड, खार, कांजुरमार्ग, कुर्ला आणि खारपट्ट्यातील मोक्याच्या जागा देशाच्या पंतप्रधानांचे मित्र गौतम अदाणी यांना दिल्या आहेत. मुलुंड जकातनाक्याची जागादेखील त्यांना दिली. सायन-कोळीवाड्यासह सिंधी कॉलनीतील जमीन, घाटकोपरमधील रमाबाई कॉलनीची जमीनदेखील अदाणींना दिली आहे. त्यापाठोपाठ मुंबईतल्या महालक्ष्मी रेसकोर्सची जागादेखील अदाणींना दिली. लोकशाहीची हत्त्या करून आपल्या मित्राला कंत्राट देण्याचं काम केलं गेलं. तसेच सरकारी निधीदेखील दिला.

हे ही वाचा >> “…तर राजकारण सोडून घरी बसेन”, शिवाजीराव अढळरावांचा उल्लेख करत दिलीप मोहितेंचा अजित पवारांना इशारा

दरम्यान, वर्षा गायकवाड यांच्या वक्तव्यावर भाजपा आमदार अमित साटम आणि आमदार आशिष शेलार यांनी हरकत घेतली. अमित साटम उभे राहिले आणि म्हणाले, “वर्षा गायकवाड यांनी मुंबई शहराच्या प्रश्नांवर बोलावं. इथे पंतप्रधानांचा काय संबंध?” साटम एवढ्यावरच थांबले नाहीत. तर ते राहुल गांधी यांचा एकेरी उल्लेख करत म्हणाले, “राहुल गांधी काय तमाशा करतो ते मी इथे सांगू का? राहुल गांधी कुठे मस्ती करतो ते इथे सांगू का? मीही सांगू शकतो. कोण कुठे तमाशा करतो, मस्ती करतो हे मी सांगू शकतो.” दरम्यान, साटम यांचं वक्तव्य रेकॉर्डवर घेतलं जाऊ नये अशी विनंती काही आमदारांनी केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp mla amit satam angry at varsha gaikwad mention pm modi gautam adani in assembly session asc