ब्रिटनस्थित व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालयातील वाघनखे भारतात आणण्यासाठी मंगळवारी, ३ ऑक्टोबर महाराष्ट्र सरकार सामंजस्य करार करणार आहे. ही वाघनखे छत्रपती शिवाजी महाराज यांची होती, असं मानलं जात आहे. वाघनखांवरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. शिवसेना ( ठाकरे गट ) आदित्य ठाकरे यांनी वाघनखांवरून काही सवाल उपस्थित केले होते. याला मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
आदित्य ठाकरे काय म्हणाले?
“व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालयातील सदर वाघनखे तीन वर्षांसाठी उसनावारी देण्याचं मान्य केलं आहे. मग, हे कर्जावर आहे की परतावा आहे? परतावा असेल, शिवाजी महाराज यांचं मंदिर व्हावं आणि त्यात वाघनखे ठेवण्यात यावी. पण, ही वाघनखे शिवकालीन की शिवाजी महाराज यांनी वापरलेली आहेत?” असे प्रश्न आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केले होते.
“इथले नकली वाघ का बिथरले?”
यावर आशिष शेलार ‘एक्स’ अकाउंटवर म्हणाले, “वाघ नखे येणार कळताच, इथले नकली वाघ का बिथरले? छत्रपतींच्या वंशजांकडे पुरावे मागणारे, आता वाघ नखांचेही पुरावे मागू लागले? आम्हाला शिवकालीन जे जे सापडेल ते ते सारे प्रिय छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेली माती सुद्धा आम्हास वंदनीय.”
“पबमधला थरथराट बाहेर असा कोण करतो का?”
“इथे हळूहळू हळूहळू औरंगजेबी वृत्ती मात्र डोकं वर काढतेय? महाराजांच्या पराक्रमाचेच इथे पुरावे मागतेय? आदू बाळाने शाळेतील पुस्तक सोडून अन्य काही वाचलेय का? यांना वाघ नख टोचतात आणि पेंग्विन घेऊन हे गावभर नाचतात? अहो, पबमधला थरथराट बाहेर असा कोण करतो का? अफझलखान तुमचा कोण पाहुणा लागतो का?” असा सवाल आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे.