मनसेच्या दीपोत्सवाचं यंदा अकरावे वर्ष. शिवाजी पार्कवर हा दीपोत्सव साजरा करण्यात आला. प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर आणि सलीम खान यांच्या हस्ते ‘दीपोत्सव २०२३’ चं उद्घाटन झालं. यावरूनच भाजपा नेते, आमदार आशिष शेलार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना लक्ष्य केलं आहे. आम्हीही एखाद्या कार्यक्रमाला सलीम खान आणि जावेद अख्तर यांना बोलवू. पण, तो कार्यक्रम दीपावलीचा नसेल, असा टोला आशिष शेलारांनी राज ठाकरेंना लगावला आहे.
भाजपातर्फे मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या दीपोत्सव कार्यक्रमात आशिष शेलार बोलत होते. “दीपोत्सवाचे आयोजन कुठल्याही पक्षाने करावे. ते स्वागतार्ह आहे. कलाकाराला जात, धर्म, भाषा नसते. पण, गुरूवारी सलीम खान आणि जावेद अख्तर यांच्या उपस्थितीत एक उद्घाटन झालं. आम्ही गायिका उत्तरा केळकर यांच्या उपस्थितीत उद्घाटन करतोय. आता मराठीचा प्रश्न कुणी कुणाला विचारायचा?” असा सवाल आशिष शेलारांनी उपस्थित केला आहे.
हेही वाचा : “हिंदू कायमच सहिष्णू होते आणि आहेत आता त्यांनीच ठरवलं की…”, जावेद अख्तर यांचं महत्वाचं विधान
“दीपोत्सव करणाऱ्यांनी सलीम खान आणि जावेद अख्तर यांना घेऊन टिमकी वाजवून घेतली. पण, आमचे मराठी कलाकार छोटे नाहीत. मराठी कलाकारांच्या उपस्थितीत दीपोत्सव झाला पाहिजे, ही भाजपाची संकल्पना आहे. आम्हीही एखाद्या कार्यक्रमाला सलीम खान आणि जावेद अख्तर यांना बोलवू. पण, तो कार्यक्रम दीपावलीचा नसेल,” असेही आशिष शेलारांनी म्हटलं.
हेही वाचा : राम, सीता देशातील सर्व नागरिकांचे दैवत! ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांचे प्रतिपादन
आशिष शेलार यांनी शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवरही टीका केली आहे. “तिसरे अजून घराबाहेर पडले नाहीत. हिंदुत्वाचे पूरस्कर्ते म्हणून आयुष्य़भर राजकारण करणाऱ्यांनी स्वत:च्या स्वार्थासाठी काँग्रेसचा हात पकडला,” असं टीकास्र शेलारांनी उद्धव ठाकरेंवर डागलं आहे.