आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडी वाढल्या आहेत. वेगवेगळ्या पक्षातील नेते आपल्या विरोधकांवर सडकून टीका करताना दिसतायत. ठाकरे गटाचे नेते तथा आमदार आदित्य ठाकरे हे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थेट आव्हान देत आहेत. हिंमत असेल तर मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्या, मी तुमच्या मतदारसंघातून निवडणूक लढवतो, असे खुले आव्हान आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना दिले आहे. यावरच आता भाजपाचे नेते तथा आमदार आशिष शेलार यांनी दंड थोपटत आदित्य ठाकरेंना डिवचले आहे.
आशिष शेलार काय म्हणाले?
आशिष शेला यांनी आदित्य ठाकरे यांना अंगात नाही बळ आणि चिमटे काढून पळ असे म्हणत खिजवले आहे. “चार वर्षांत कलानगरवरून वरळीपर्यंत पोहोचू न शकलले आमदार आता वरळीतून पळ काढून एवढ्या लांब ठाण्याला कधी पोहोचणार? त्यापेक्षा आदित्य ठाकरे तुम्ही जिथे राहता, त्या वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातून का लढत नाही?” असा सवाल आशिष शेलार यांनी केला.
“तातडीने राजीनामा द्या आणि आमचा सामना करा”
“वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातून तुम्हाला कुटुंबातीलच काही मते मिळणार नाहीत, याची भीती वाटते का? अंगात नाही बळ आणि चिमटे काढून पळ असले धंदे बंद करा. तातडीने राजीनामा द्या आणि आमचा सामना करा,” असे थेट आव्हानच आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरेंना दिले.
आदित्य ठाकरे नेमकं काय म्हणाले होते?
आदित्य ठाकरे रविवारी (१८ फेब्रुवारी) ठाण्यात एका सभेला संबोधित करत होते. यावेळी बोलताना “सर्वेक्षणात आपण पहिल्या क्रमांकावर आहोत. त्यामुळे हे महापालिकांच्या निवडणुका घेण्याची हिमंत दाखवीत नाहीत. हिमंत असेल तर मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्या. मी तुमच्या मतदारसंघातून लढायला तयार आहे,” असे आव्हान ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले. मला पद नकोय, मी माझ्या महाराष्ट्रासाठी लढतो आहे, असेही ते म्हणाले होते.