मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार हे कवितेच्या माध्यमातून शिवसेना आणि काँग्रेसवर नेहमी टीका करत असतात. काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी काल काँग्रेसचा राजीनामा देत स्वपक्षावर गंभीर आरोप केले. काँग्रेस आणि शिवसेनेची युती झाल्यापासून संजय निरुपम यांनी कधी दबक्या आवाजात तर कधी उघडपणे शिवसेनेवर टीका केलेली आहे. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने उत्तर पश्चिम मतदारसंघात उमेदवारी मिळण्यावरून संजय निरुपम आणि संजय राऊत यांचा कलगीतुरा रंगला होता. अखेर संजय निरुपम यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन काँग्रेस आणि शिवसेनेवर तोंडसुख घेतले. या कलगीतुऱ्यावरच आशिष शेलार यांनी विंडबनात्मक कविता केली असून “या दोघांपेक्षाही महाराष्ट्राची हास्यजत्रेमधील आमचा प्रभाकर मोरे बरा…”, असे सुचवले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आशिष शेलार यांनी काय म्हटले?

आशिष शेलार यांनी एक्सवर पोस्ट केलेल्या कवितेमध्ये दोन्ही संजय मध्यरात्र झाल्यानंतर एकमेकांना भेटले, या वाक्याने कवितेची सुरुवात करतात. त्यानंतर दोन्ही संजय एकमेकांविरोधात कसे आरोप-प्रत्यारोप करत असतील, यावर कविता लिहिली गेली आहे. तसेच शेवटी यांच्या हास्यजत्रेपेक्षा केव्हाही आमचा प्रभाकर मोरे बरा… असा टोला आशिष शेलार यांनी लगावला आहे.

आशिष शेलार यांनी शेअर केलेली पूर्ण कविता :

…यांच्यापेक्षा बरा आमचा प्रभाकर मोरे!!

मध्यरात्र झाल्यानंतर
शहरातील दोन संजय एकमेकांना भेटले…!

विश्वविख्यात हातवारे करीत, केसांचा कोंबडा उडवीत,
मध्येच “मातोश्री”कडे पाठ
आणि “सिल्वर ओक”च्या दिशेने कटाक्ष टाकीत.. नजर शुन्यात टाकून “बाईट”चा हावभाव करु लागले…

दुसरे संजय, काँग्रेसच्या पराभवाची कारणे बसले होते वाचतं!
ते बसले होते ती खुर्ची पण होती त्यांना टोचत!!

तू रोज बोलतोस, म्हणून अख्खा
पक्षच गेला सोडून
मी एकदाच बोललो आणि पक्षाला दिला राजिनामा फाडून !

विश्वविख्यात म्हणाले…
मला कशाला तुझ्या सोबत ओढतोस ?
फुटक्या आघाडीला आणखी कशाला फोडतोस?

आम्ही म्हणजे आम्ही म्हणजे आम्ही म्हणजे आम्हीच..
काँग्रेस महाराष्ट्रात आमच्या समोर कमीच!

त्यावर रामभक्त संजय खवळले आणि म्हणाले..

उबाठा गटानेच काँग्रेसचे वाजवले तीनतेरा
तुम्ही म्हणजे जिथे जाल तिथे सैतानाचा फेरा!

निकाल तुम्हीच लावणार उरल्या सुरल्या काँग्रेसचा
इंतजाम करुन ठेवा, युवराजांच्या परदेशी तिकिटाचा

कशाला आघाडीचं नाटक करताय?
पायात पाय घालून एकमेकांना पाडताय?

माझ्या राजीनाम्यासाठी दबाव तुमचा ?
तुमच्या “खिचडीत” मीच फिरवतो आता चमचा !

जो ना रामाचा तो काय कामाचा?

एवढं ऐकल्यावर विश्वविख्यात चिडले..
“सामना” रंगतदार होणार म्हणून वेटर सगळे टेबला भोवती जमले!

गर्दी बघून दोघे ही सावरले
बोलती बंद अन् संवाद सगळे थांबले

दोघांचे ही क्षणात चेहरे कसे कोरे
यांच्या “हास्यजत्रे” पेक्षा केव्हाही
बरा आमचा प्रभाकर मोरे!

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp mla ashish shelar slams sanjay raut and sanjay nirupam ahead of lok sabha election 2024 share poem kvg