देशातील लोकसभा निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी विरोधकांनी एकत्र येत ‘इंडिया’ आघाडीची स्थापना केली आहे. बिहार, कर्नाटकनंतर महाराष्ट्रात ‘इंडिया’ आघाडीची तिसरी बैठक पार पडत आहे. महाविकास आघाडीने या बैठकीचं आयोजन केलं आहे. तर, शिवसेनेकडून ( ठाकरे गट ) बैठकीसाठी जोरदार तयारी करण्यात येत आहे. ठिकठिकाणी बॅनरबाजीही करण्यात आली आहे. यावरून भाजपा आमदार आशिष शेलार यांनी ठाकरे गटाला लक्ष्य केलं आहे.
“काय ती होर्डिंग लावत आहेत… केवढे ते फोटो… कोण कुणाकडे पाहतोय आणि कोण कुणाला हसतोय काही कळत नाही. भाजपाबरोबर होते तेव्हा भलेमोठे फोटो होर्डिंगवर झळकत होते. आता सोळा केले गोळा आणि स्वतःच स्वतःचा करून घेतला पालापाचोळा!”, असा टोला आशिष शेलार यांनी ठाकरे गटाला लगावला आहे.
हेही वाचा : “त्यांना कसं संपवायचं, हे…”, नितीन गडकरींविरुद्धच्या कथित कटाबद्दल संजय राऊतांचं विधान
ट्वीट करत आशिष शेलार म्हणाले, “मराठीत गाजलेल्या ‘अशी ही बनवाबनवी’ सिनेमातील ते दृश्य… स्त्री वेशातील लक्ष्मीकांत बेर्डे म्हणजे पार्वतीच्या डोहाळे जेवणाची लगबग सुरु… ‘न होणाऱ्या’ बाळासाठी खोटी खोटी सजावट… सत्य सगळ्यांना माहिती असतानाही केवळ आपले ‘घर’ टिकवता यावे म्हणून धडपड… नटूनथटून बाकी मित्र नाचत आहेत…’कोणी तरी येणार येणार गं… पाहुणा घरी येणारं गं..’ हे गाणं गात आहेत.”
“उबाठा गटाकडून मुंबईत तथाकथित ‘इंडिया’नावाच्या आघाडीच्या स्वागताची जी लगबग सुरु आहे ती पाहताना… वरील दृश्य पटकन आठवते. काय ती होर्डिंग लावत आहेत… केवढे ते फोटो… कोण कुणाकडे पाहतोय आणि कोण कुणाला हसतोय काही कळत नाही… भाजपाबरोबर होते, तेव्हा भलेमोठे फोटो होर्डिंगवर झळकत होते. आता सोळा केले गोळा आणि स्वतःच स्वतःचा करून घेतला पालापाचोळा”, अशी टोलेबाजी आशिष शेलार यांनी ठाकरे गटावर केली आहे.
हेही वाचा : चंद्रकांत पाटलांकडून अजित पवारांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार? उदय सामंतांची प्रतिक्रिया, म्हणाले…
मुंबईत कसं असणार नियोजन?
३१ ऑगस्टला सायंकाळी ६ वाजता ‘इंडिया’ आघाडीसाठी आलेल्या नेत्याचं स्वागत केलं जाईल. सायंकाळी ६.२० ते ८२० या वेळेत अनौपचारिक बैठक पार पडेल. त्यानंतर ८.३० ला इंडिया आघाडीची डिनर डिप्लोमसी असेल. उद्धव ठाकरेंकडून ‘इंडिया’ आघाडीच्या नेत्यांसाठी डिनरचं आयोजन करण्यात आलं आहे. १ सप्टेंबरला सकाळी १०.३० ते दुपारी २ दरम्यान ‘इंडिया’ आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडेल. जेवणानंतर ३.३० वाजता पत्रकार परिषद होणार आहे.