शिवसेना खासदार संजय राऊत जामिनानंतर तुरुंगाबाहेर आल्यावर अधिक आक्रमक दिसतील असा अंदाज बांधला जात असतानाच प्रत्यक्षात चित्र वेगळं दिसलं. राऊतांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं तोंडभरून कौतुक केलं आणि कटुता संपवण्याची भाषा केली. तसेच फडणवीसांची भेट घेणार असल्याचं सांगितलं. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा आमदार अतुल भातखळकर यांना विचारणा केली असता त्यांनी संजय राऊतांना जोरदार टोले लगावले. ते गुरुवारी (१० नोव्हेंबर) एपीबी माझाशी बोलत होते.
अतुल भातखळकर म्हणाले, “चांगली गोष्ट आहे. संजय राऊत कटुता संपवण्याची भूमिका मांडणार असतील, तर चांगली गोष्ट आहे. फक्त त्याची सुरुवात त्यांनी स्वतःपासून,स्वतःच्या पक्षापासून करायला हवी. खोके, गद्दार, खंजीर, लोकांना घरात जाऊन मारहाण केल्यानंतर शिवसैनिकांचं समर्थन करणं, माजी नौदल अधिकाऱ्यांना केलेली मारहाण हेही थांबवावं.”
“कटुता वाढण्याला सर्वस्वी जबाबदार शिवसेना आणि…”
“मागील दोन अडीच वर्षात महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनातील कटुता वाढली. याला सर्वस्वी जबाबदार शिवसेना, त्यांचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शरद पवार, जितेंद्र आव्हाड अशी मंडळी आहे,” असा आरोप भातखळकरांनी केला.
कटुता संपवावी ही भूमिका फडणवीसांनी घेतली आहे. कारण…
अतुल भातखळकर पुढे म्हणाले, “कटुता संपवावी ही भूमिका देवेंद्र फडणवीसांनी घेतली आहे. कारण आमची ती कायमची भूमिका आहे. अटलबिहारी वाजपेयी कायम म्हणत आलेत आणि आम्हीही म्हणत आलो की, राजकारणात कोणी कोणाचा शत्रू नसतो, तर विरोधक असतो. हल्ले करायचे, घाणेरड्या भाषेत बोलायचं असं सुरू आहे.”
हेही वाचा : संजय राऊतांच्या जामिनानंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “पाळीव प्राण्याप्रमाणे…”
“…तरच महाराष्ट्राच्या राजकारणातील कटुता संपण्याची शक्यता”
“संजय राऊतांनी काय भाषा वापरली हे सर्वांना माहिती आहे. त्यांनी जी भाषा वापरली ती ना माध्यमं दाखवू शकले, ना मी आत्ता ते बोलू शकतो. ही पश्चात बुद्धी आहे, मात्र तरीही त्याचं स्वागत आहे. त्यांना कटुता संपवण्याच्या दिशेने पावलं टाकायची असतील तर आजपासून त्यांच्या व्यवहारात त्याचं दर्शन घडावं. तसं झालं तरच महाराष्ट्राच्या राजकारणातील कटुता संपण्याची शक्यता आहे,” असंही त्यांनी नमूद केलं.