शिवसेना आणि भाजपा यांच्यामध्ये गेल्या अडीच वर्षापासून सातत्याने टोलेबाजीचं राजकारण रंगताना पाहायला मिळालं आहे. विशेषत: राज्यातल्या काही धोरणात्मक निर्णयांमुळे या दोन्ही पक्षांमध्ये सुंदोपसुंदी सुरूच आहे. कोकणातील रिफायनरी प्रकल्प हा त्यातलाच एक मुद्दा ठरला आहे. सत्तेत असताना देखील शिवसेनेनं गेल्या सरकारमध्ये नाणारविरोधी भूमिका घेतली होती. त्यानंतर काहीसं वेगळं धोरण घेत स्थानिकांना जे मान्य असेल, त्यासोबत शिवसेना असेल, अशी भूमिका जाहीर करण्यात आली. यासंदर्भात आज आदित्य ठाकरेंनी सिंधुदुर्ग दौऱ्यादरम्यान केलेल्या विधानावरून आता भाजपानं टोला लगावला आहे.
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे सध्या कोकण दौऱ्यावर असून सिंधुदुर्गात त्यांनी रिफायनरी प्रकल्पाची मागणी करणाऱ्या काही स्थानिकांची भेट घेतली. यावेळी त्यांनी राज्य सरकारची भूमिका स्पष्ट करतानाच कोकणात रिफायनरी प्रकल्प यायचा असेल, तर काही महत्त्वाच्या गोष्टींचा उल्लेख देखील त्यांनी केला. या गोष्टी होणार असतील, तरच इथे प्रकल्प येऊ शकतो, असं त्यांनी नमूद केलं. यावरून भाजपानं टोला लगावला आहे.
भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी याबाबत खोचक ट्वीट केलं आहे. “प्रदूषण होणार नसेल, तर रिफायनरीला मान्यता देऊ – इति आदित्य ठाकरे. फडणवीस सरकार असताना तुम्ही रिफायनरी कोणत्याही परिस्थितीत नकोच म्हणत होतात. मग आता ही अर्थपूर्ण सुबुद्धी कशी काय सुचली बुवा?” असा खोचक सवाल अतुल भातखळकर यांनी उपस्थित केला आहे.
“कोकणात रिफायनरी यायची असेल, तर काही गोष्टी महत्त्वाच्या”, आदित्य ठाकरेंनी सांगितली त्रिसूत्री!
आदित्य ठाकरेंनी दिली प्रकल्पासाठी त्रिसूत्री…
“…रिफायनरीबद्दल दोन मतं आहेत. पाठिंबा आणि विरोध. कोणताही मोठा प्रकल्प येत असताना काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक तर इथे सगळ्यांशी चर्चा व्हायला हवी. स्थानिक भूमिपुत्रांना विश्वासात घ्यायला हवं. दुसरी बाब म्हणजे प्रकल्पग्रस्तांना कसा न्याय मिळणार? त्यांना दुसरीकडे कसं हलवायचं हे पाहावं लागेल. तिसरं म्हणजे एखादा मोठा प्रकल्प येताना स्थानिक भूमिपुत्रांना नोकऱ्या कशा मिळतील, महिलांना नोकऱ्या कशा मिळतील. हे होत असेल तरच नवीन प्रकल्प आपण आणू”, असं आदित्य ठाकरेंनी यावेळी सांगितलं आहे.